AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local News | चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; लोकल उशिराने

Mumbai Local News | चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; लोकल उशिराने

| Updated on: Aug 10, 2026 | 1:47 PM
Share

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील चाकरमान्यांना लोकलच्या खोळंब्याचा मोठा फटका बसला आहे. सकाळच्या वेळेत पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर विविध ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नोकरीसाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर बराच वेळ लोकलची वाट पाहावी लागत असून, अनेक स्थानकांवर आणि लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील चाकरमान्यांना लोकलच्या खोळंब्याचा मोठा फटका बसला आहे. सकाळच्या वेळेत पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर विविध ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नोकरीसाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर बराच वेळ लोकलची वाट पाहावी लागत असून, अनेक स्थानकांवर आणि लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे.

पश्चिम रेल्वेच्या विविध मार्गांवर पॉइंटमध्ये बिघाड झाल्याने काही लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. वसई रोड येथे पहाटे 4.46 वाजल्यापासून DIVA डाऊन आणि अप फास्ट मार्गावरील PT 111/112 पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पॉइंट क्लॅम्पिंगचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे अप फास्ट लोकलच्या वाहतुकीवर परिणाम झाला. यानंतर दादर स्थानकात सकाळी 10.10 वाजता अप फास्ट आणि डाऊन फास्ट मार्गावरील पॉइंट क्रमांक 143/144 रिव्हर्सवरून नॉर्मल स्थितीत न आल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून हा बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

गोरेगाव येथेही सकाळी 10.22 वाजता अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील पॉइंट क्रमांक 127/128 आणि 129/130 मध्ये बिघाड झाला. या तांत्रिक समस्येमुळे गोरेगाव आणि अंधेरीदरम्यान लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याने स्थानकांवरही मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. सध्या पश्चिम रेल्वेवरील वाहतूक साधारण 40 ते 45 मिनिटे उशिराने सुरू असल्याची माहिती आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लोकल उशिराने धावत आहेत. काही जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्याने प्रवाशांना आणखी विलंबाचा सामना करावा लागत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने चाकरमान्यांना ‘लेट मार्क’ची चिंता सतावत आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेच्या वाहतुकीलाही तांत्रिक बिघाडाचा फटका बसला आहे. मुलुंडदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ठाणे ते CSMT दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले तरी रेल्वे सेवा पूर्वपदावर येण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकल सुमारे 30 मिनिटे उशिराने, तर CSMTच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. मुलुंड ते ठाणे दरम्यान रेल्वे रुळांवर एकामागोमाग एक लोकल उभ्या राहिल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करून लोकल सेवा सुरळीत करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सध्या प्रवाशांना मोठ्या गर्दीचा आणि विलंबाचा सामना करावा लागत आहे.

Published on: Aug 10, 2026 01:47 PM

Follow Us