हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडाच्या टोकावर ‘त्याचं’ आंदोलन, पण मागणी नेमकी काय?
विधानभवन परिसरात असलेल्या झाडाच्या टोकावर व्यक्तीचं आंदोलन सुरू आहे. त्यामुळे धक्कादायक घटना घडू शकते अशी देखील भीती सध्या वर्तवण्यात येत आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला आहे.
मुंबईतील विधानभवनात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते. आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. मात्र या शेवटच्या दिवशीच विधानभवन परिसरात एका झाडावर एक व्यक्ती चढल्याचे पाहायला मिळाले. काही मागण्यांसाठी या व्यक्तीने थेट झाडावर चढून आंदोलन केले आहे. या व्यक्तीच्या हातात भारताचा झेंडा असून एक बॅनरदेखील त्याच्याजवळ दिसतंय. या व्यक्तीने झाडावरून खाली उतरावे यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहे. मनधरणी केल्यानंतरही हा व्यक्ती आंदोलनावर ठाम आहे. विधानभवन परिसरातील एका झाडावर चढून व्यक्तीचं आंदोलन सुरू असताना बघ्यांची देखील मोठी गर्दी होऊ लागली आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी या ठिकाणी हजर झाले असून त्याला खाली उतरवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, सेंद्रीय मॉलच्या संकल्पनेसाठी व्यक्तीचं आंदोलन सुरु असल्याचे सांगितले जातेय. तर सेंद्रीय मॉलच्या संकल्पनेचं बॅनर घेऊन व्यक्तीने आंदोलन सुरु केलं आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत झाडावरुन खाली उतरणार नाही…’ असा आक्रमक पवित्रा व्यक्तीने घेतला आहे.