Narayan Rane | राज्याला मुख्यमंत्री आणि प्रशासन नाही : नारायण राणे

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 25, 2021 | 6:40 PM

चिपळूणमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीवरून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

चिपळूण: चिपळूणमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीवरून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यात पूरस्थिती आली आहे. त्यानंतर चार दिवसाने मुख्यमंत्री चिपळूणमध्ये आले. हे कसले मुख्यमंत्री आहेत. मी तर म्हणतो राज्याला प्रशासनही नाही आणि मुख्यमंत्रीही नाही, असा हल्ला चढवतानाच राज्य चालवता येत नसेल तर केंद्राला देऊन टाका. आम्ही वेटिंगवरच आहोत, असा उपरोधिक टोला नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. (Narayan Rane Attacks on CM Uddhav Thackeray over flood and landslide Konkan)

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चिपळूणच्या बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच टीका केली. तुम्ही मदत मागायच्या आधीच मोदींनी पाठवली आहे. बाकीची मदत आम्ही मिळवून देऊ. कोणी मागायची गरज नाही. केंद्र कोणतीही मदत बाकी ठेवत नाही. केंद्र सर्व मदत देते, असं सांगतानाच केंद्रालाच सारखी सारखी मदत मागायची असेल तर राज्य कशाला आहे. देऊन टाका राज्य केंद्राला चालवायला. इथे आम्ही वेटिंगवर बसलोय, असं देवेंद्र फडणवीसांकडे पाहून मिश्किल हसत राणे म्हणाले. यावेळी एकच खसखस पिकली.

आम्ही राजकारण करत नाही

काय केंद्र केंद्र म्हणताय… राज्याचा बजेट चार साडेचार लाखांचा आहे. तरीही मदत देता येत नाही. केंद्राकडे जेव्हा मदत मागता तेव्हा केंद्र सरकार देत असते. आज तर मुख्यमंत्र्यांनी केंद्राचं कौतुक केलं आहे. आज विनम्र झाले आहेत ते, असं सांगतानाच आम्ही राजकारण करत नाही. राजकारण ज्याला करता येत नाही त्याच्याशी आम्ही राजकारण करत नाही. आम्ही आमच्या तोडीच्या लोकांशी राजकारण करतो, असा चिमटा राणेंनी काढला.

काय मुख्यमंत्री? कसली संवेदना?

मुख्यमंत्री चौथ्या दिवशी कोकणात का आले ते सांगतो. काल साडे सहाला माझा फॅक्स आला. मी कोकणात येत असल्याचं कळवलं होतं. त्यानंतर त्यांनी पूरपरिस्थिती पाहण्याचा कार्यक्रम तयार केला. तेव्हा मातोश्रीचा दरवाजा उघडला. नाही तर बंद होता. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असतात तसे ते अॅडमिट होते. आज सकाळी त्यांना डिस्चार्ज झाला. तर ते डायरेक्ट चिपळूणमध्ये आले. काय मुख्यमंत्री? कसली संवेदना? ही परिस्थिती झाल्या झाल्या त्यांनी यायला हवं होतं. उभं राहून सर्व यंत्रणा कामाला लावायला हवी होती, असं ते म्हणाले. पाठांतर करून यायाचं आणि बोलायचं. कसला मुख्यमंत्री. या राज्यात मुख्यमंत्री नाही. प्रशासन नाही. अशी भयावह परिस्थिती आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

(Narayan Rane Attacks on CM Uddhav Thackeray over flood and landslide Konkan)

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI