AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupali Thombre Patil | प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती; रुपाली ठोंबरे यांच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ!

Rupali Thombre Patil | प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती; रुपाली ठोंबरे यांच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ!

| Edited By: | Updated on: Aug 08, 2026 | 11:58 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याचा दावा करण्यात आला आहे. “प्रदेशाध्यक्ष बदलला तरच तुमच्यासोबत काम करणं शक्य होईल,” अशी भूमिका प्रशांत किशोर यांनी मांडल्याची माहिती समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मोठा दावा केला आहे. “जगदंबेची शपथ घेऊन सांगते, प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती. अजितदादांचं ते स्वप्न होतं,” असा दावा त्यांनी केला आहे. टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भूमिकेवरही भाष्य केले.

रुपाली पाटील ठोंबरे यांच्या म्हणण्यानुसार, पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी 15 नोव्हेंबरला अजित पवार यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती. त्यावेळी “मी प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे, तुम्ही कामाला लागा. आपल्याला पुणे महापालिका निवडणूक जोमाने लढायची आणि जिंकायची आहे,” असे अजित पवार यांनी सांगितल्याचा दावा त्यांनी केला. अजित पवार यांनी केवळ आपल्याशीच नव्हे, तर अनेक कार्यकर्त्यांशी अशाच प्रकारची चर्चा केली होती, असेही ठोंबरे यांनी म्हटले.

सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावर दोन-तीन वर्षे झाली असून, आता पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी नव्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज असल्याचे रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितले. पक्ष मजबूत करण्यावर भर देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या कार्यकाळात काही निर्णय घेण्यात आले होते आणि त्यांची अंमलबजावणी होणार होती. अजितदादा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून काही निर्णय घेत होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे जबाबदारी आल्याने अजित पवार यांनी ठरवलेल्या काही गोष्टी पुढे जाऊ शकल्या नाहीत, असा दावा ठोंबरे यांनी केला.

यावेळी त्यांनी सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्यानंतर संबंधितांना नियुक्तीपत्र देण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र त्यात दिरंगाई झाल्याचा आरोप त्यांनी केला. अजित पवार यांनी सांगूनही काही कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र मिळत नव्हते आणि कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचेही त्या म्हणाल्या.

“आमचं तटकरेंशी भांडण नाही, वाद नाही. मात्र पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी पुढे यावं आणि प्रदेशाध्यक्षपद सोडावं,” अशी भूमिका रुपाली पाटील ठोंबरे यांनी मांडली आहे. त्यामुळे प्रशांत किशोरांचा कथित सल्ला, रुपाली ठोंबरे यांचा अजित पवारांच्या इच्छेबाबतचा दावा आणि प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.

Published on: Aug 08, 2026 11:51 AM

Follow Us