Parth Pawar Land Deal : पुणे जमीन गैरव्यवहारात पार्थ पवारांना क्लीनचिट! दमानियांकडून अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी
पुण्यातील चाळीस एकर सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात नोंदणी विभागाच्या पहिल्या अहवालात पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली आहे, ज्यात त्यांचे नावच नाही. मात्र, अंजली दमानिया यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी दुसरी समिती स्थापन करण्यात आली असून, तिचा अहवाल अपेक्षित आहे.
पुण्यातील चाळीस एकर सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात नोंदणी विभागाचा पहिला अहवाल समोर आला आहे. या अहवालात पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे, कारण अहवालात त्यांच्या नावाचा उल्लेख नाही. सहनोंदणी उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने हा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला आहे. या अहवालात पार्थ अजित पवार यांच्या मीडिया कंपनीचे एक टक्का भागीदार असलेले दिग्विजय पाटील, जमीन लिहून देणाऱ्या शितल तेजवानी आणि उपनिबंधक रवींद्र तारू यांचा उल्लेख आहे. दिग्विजय पाटील आणि शितल तेजवानी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
भविष्यात असे गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी मुठे समितीने शिफारसी देखील केल्या आहेत. या क्लीन चिटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. पार्थ पवारांना वाचवले जात असल्याचा आरोप करत, अंजली दमानिया यांनी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती काम करत असून, तिचा अहवाल पंधरा दिवसांत अपेक्षित आहे.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?

