पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ, विरोधकांच्या मोर्चामुळे राजधानीत वातावरण तापलं!
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या ३०० हून अधिक खासदारांनी निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांना आकाशवाणी भवनाजवळ रोखले. राहुल गांधींनी पोलिसांच्या कारवाईवर आणि निवडणूक आयुक्तांच्या भेटी नाकारण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपने लोकशाहीचे "हायजॅक" केले असून निवडणूक आयुक्तांनी मतचोरीला मदत केल्याचा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीतील ३०० हून अधिक खासदारांनी आज संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढला. मतचोरीच्या आरोपांबाबत निवडणूक आयुक्तांना भेटण्याची त्यांची मागणी होती. मात्र, पोलिसांनी त्यांना आकाशवाणी भवनाजवळ रोखले.या घटनेनंतर राहुल गांधींनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“पोलीस आम्हाला का अडवतायत आणि धमकावतायत?” असा सवाल त्यांनी केला. तसेच, “आम्ही करोडो भारतीयांचे प्रतिनिधित्व करतो, मग निवडणूक आयुक्त आम्हाला का भेटत नाहीत?” अशी विचारणाही त्यांनी केली. निवडणूक आयोगाचे कार्यालय जवळ असतानाही खासदारांना पुढे जाण्यापासून रोखल्याने विरोधकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. राहुल गांधींनी यावेळी भाजपवर लोकशाही “हायजॅक” केल्याचा आणि ज्ञानेश कुमार यांनी मतचोरीला मदत केल्याचा गंभीर आरोपही केला.

