AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena | धनुष्यबाणावर संकट की दिलासा? सुनावणीपूर्वी शिंदेंची मंत्र्यांसोबत बंद दाराआड बैठक

Shivsena | धनुष्यबाणावर संकट की दिलासा? सुनावणीपूर्वी शिंदेंची मंत्र्यांसोबत बंद दाराआड बैठक

| Updated on: Aug 04, 2026 | 2:12 PM
Share

शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हाच्या मालकी हक्कासंदर्भातील महत्त्वाच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्यापूर्वी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली असून, गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकी हक्कासंदर्भातील महत्त्वाच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्यापूर्वी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली असून, गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील आमदारांनी बंड पुकारल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. या राजकीय घडामोडींनंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या हक्कावर दावा केला होता. गेल्या तीन वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

दरम्यान, आज होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली आहे. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, संभाव्य निकाल, त्यानंतरची राजकीय भूमिका आणि कायदेशीर पर्याय यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

यापूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले होते. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव आणि ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले होते. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत.

आजच्या सुनावणीकडे महाराष्ट्रातील राजकीय पक्ष, शिवसैनिक आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील भूमिकेचा राज्याच्या राजकारणावर महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Aug 04, 2026 02:12 PM

Follow Us