AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना कोर्टाचा झटका? 17 वर्षांनंतर त्या मानहानी प्रकरणात महत्त्वाची सुनावणी

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना कोर्टाचा झटका? 17 वर्षांनंतर त्या मानहानी प्रकरणात महत्त्वाची सुनावणी

| Updated on: Jul 30, 2026 | 4:03 PM
Share

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील तब्बल 17 वर्षांपूर्वीच्या मानहानी प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळाले आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दाखविण्यात आलेल्या कथित व्हिडिओप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानी खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, 5 ऑगस्ट रोजी कल्याण न्यायालयात या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत उद्धव ठाकरे यांचा कलम 313 अंतर्गत जबाब नोंदवला जाणार आहे.

दिवंगत वसंत डावखरे यांनी 2009 मध्ये उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. 22 एप्रिल 2009 रोजी झालेल्या प्रचारसभेत दाखविण्यात आलेल्या कथित व्हिडिओमुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप डावखरे यांनी केला होता. या प्रकरणाची अधिकृत नोंद 14 सप्टेंबर 2009 रोजी झाली होती आणि सध्या खटला अंतिम सुनावणीपूर्वीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी माहिती देताना सांगितले की, उद्धव ठाकरे न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. यासाठी पक्षाचे विधी सल्लागार आणि नेते अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण न्यायालयात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

न्यायालयाच्या परवानगीनंतर व्हीआयपी व्यक्तींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्याची मुभा असते. मोठा पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा यंत्रणेवरील ताण टाळण्यासाठी हा पर्याय स्वीकारला जात असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणातील सहआरोपी तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची परवानगी मागितल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रारदार दिवंगत वसंत डावखरे यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदारांकडून हा खटला पुढे चालवला जात आहे. सर्व आरोपींचे जबाब नोंदवल्यानंतर अंतिम युक्तिवाद होणार असून, त्यानंतर न्यायालय या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणावर निकालाच्या दिशेने पुढील प्रक्रिया सुरू करणार आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी 2009 च्या कल्याण लोकसभा निवडणुकीशी संबंधित आहे. त्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी एक कथित व्हिडिओ सार्वजनिकरित्या दाखवला होता. त्या व्हिडिओमध्ये वसंत डावखरे निवडणूक अधिकाऱ्यांची पर्वा न करता निवडणूक जिंकण्याचे आवाहन करत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, हा व्हिडिओ बनावट आणि एडिट केलेला असून, केवळ आपली बदनामी करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप करत वसंत डावखरे यांनी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. आता तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे.

Published on: Jul 30, 2026 04:03 PM

Follow Us