Crop Insurance : 1 रुपयांत पीक विमा योजनेत गैरप्रकार; योजना खरंच बंद होणार? काय म्हणाले राज्याचे कृषीमंत्री
Manikrao Kokate on One Rupees Crop Insurance : लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थी महिलांची नावं कमी होण्याचा धुराळा खाली बसतो ना बसतो तोच पीक विमा योजनेवरून वाद पेटला आहे. काय म्हणाले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे?

1 रूपयांत पीक विमा योजनेवर संकटाचे ढग जमा झाले आहे. सध्या राज्यात लाडकी बहीण योजना, पालकमंत्री पद, बीडमधील घटना आणि आता पीक विमा योजनेवरून राज्यातील राजकारण तापले आहे. या योजनेत बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले. त्यानंतर या योजनेलाच घरघर लागण्याची भीती व्यक्त होत आहे. एक रुपयांत पीक विमा योजनेत बदल करून शेतकऱ्यांना आता एक रुपयांऐवजी 100 रुपये भरण्याची शिफारस करण्यात आली आहे. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही शिफारस केल्याने एकच खळबळ उडली आहे. एक रुपयांत पीक विमा योजना बंद होणार का? असा सवाल विचारण्यात येत आहे.
काय म्हणाले कृषी मंत्री
राज्य सरकारने सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवते. त्यात केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेत एक रुपया भरुन सहभागी होता येते. पण बीडमध्ये बोगस पीक विमा प्रकरणं समोर आल्यानंतर या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ही योजना बंद होणार अशी चर्चा राज्यभर रंगली आहे. त्यावर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या योजनेविषयीचा जो काही निर्णय असेल तो कॅबिनेटमध्ये घेण्यात येईल असे ते म्हणाले.




कडक शिक्षा करा
तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या गावात असे गैरप्रकार झाले, त्यांच्यावर कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तर एक रुपयात पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास आले आहे. प्रकरणात दोन दिवसांपूर्वी काही जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली.
मग सरकारही बंद करा
पीकविमा योजनेत भ्रष्टाचार होते म्हणून ती बंद करत असाल, तर सरकारमध्येही भ्रष्टाचार होतो. सरकारंही बंद करावं का, असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केला. एक रुपयांत पीक विमा योजना बंद केली, तर विदर्भासह राज्यात शेतकरी आत्महत्या वाढतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तर पीक विमा योजना राज्यात अशीच सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली.