तीन जिल्ह्यातील रब्बी पिकांना जायकवाडी धरणातील पाणी, प्रथमच शेती सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग

| Updated on: Nov 23, 2021 | 11:58 AM

शेतीसाठी राखीव असणारे पाणी आता दिले जाणार आहे. त्याच अनुशंगाने जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून 100 क्युसेसने सुरु करण्यात आलेल्या या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबाद, जालना आणि परभणी या जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांना याचा फायदा होणार आहे.

तीन जिल्ह्यातील रब्बी पिकांना जायकवाडी धरणातील पाणी, प्रथमच शेती सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

औरंगाबाद : अतिवृष्टीने जसे खऱीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे आता त्याप्रमाणात रब्बी हंगामतील पिकांना याचा फायदाही होताना पाहवयास मिळत आहे. कारण मराठवाड्यातील 6 मुख्य प्रकल्प हे यंदाच्या पावसाळ्यात तुडूंब भरलेली होती. त्यामुळे शेतीसाठी राखीव असणारे पाणी आता दिले जाणार आहे. त्याच अनुशंगाने जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून 100 क्युसेसने सुरु करण्यात आलेल्या या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबाद, जालना आणि परभणी या जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांना याचा फायदा होणार आहे. या तीन जिल्ह्यातील 1 लाख 41 हजार हेक्टरावरील पिकांना याचा फायदा होणार आहे.

धरण उभारणीचा मूळ उद्देशच हा शेतीला पाणी पुरवण्यासाठीचा होता. मात्र, काळाच्या ओघाच हा उद्देश बाजूला राहिला आणि पिण्याच्या पाण्यालाच प्राधान्य देण्यात आले. मात्र, यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने शेतीलाही पाणी देणे शक्य झाले आहे.

पाटबंधारे विभागाचा निर्णय अन् शेतकऱ्यांचे हीत

मराठवाड्यातील सर्वच धरणे ही यंदा पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे रब्बी हंगामासाठी कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. रविवारी जयाकवाडी प्रशासनाने डाव्या कालव्यातून 200 क्युसेसप्रमाणे पाणी सोडण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आता मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 41 हजार हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे पाणी प्रश्न हा मिटणार असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे.

या पिकांना होणार फायदा

रब्बी हंगामातील पेरण्या ह्या सुरु आहेत. तर पहिल्या टप्प्यात ज्वारी, हरभरा, मका यांचा पेरा झाला आहे. पिकांची उगवण होताच आता धरणातील पाणी सोडण्यात आल्याने पाणी प्रश्न हा मिटलेला आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे रब्बी हंगामात हरभरा या पिकावर शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे. याच बरोबर या तीन जिल्ह्यातील गहू, बाजरी, ज्वारी, तूर, हरभरा, मका, ऊस या पिकांना पाणी देता येणार आहे. तब्बल 122 किलोमिटरच्या क्षेत्रापर्यंत हा पाणीपुरवठा केला जात आहे.

पाणीपुरवठा करुनही अडचणी कायम

पाटबंधारे विभागाने योग्य वेळी पाण्याचा पुरवठा केलेला आहे. यंदा शेतकऱ्यांना धरणातील पाण्याचा चांगला उपयोगही होणार आहे. पण रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याच्या दरम्यानच महावितरणने वसुली मोहिम सुरु केली आहे. विशेष म्हणजे थकबाकीदारांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा करुनही त्याचा किती उपयोग होणार हा प्रश्न कायम आहे. पाटबंधारे विभागाने जसा शेतकऱ्यांच्या हीताचा निर्णय घेतला आहे तीच भूमिका महावितरण कंपनीनेही घ्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

संबंधित बातम्या :

उदगीरच्या शेतकऱ्यांना मिळणार आता योग्य बाजारपेठ, रेल्वे प्रशासनाने घेतला शेतकऱ्यांच्या हीताचा निर्णय

थकीत ‘एफआरपी’चा गुंता आता उच्च न्यायालयात, लोकवर्गणीतून उभारला जाणार लढा

बीजोत्पादनाचे दोन फायदे म्हणूनच महाबिजची गावोगावी जनजागृती, उस्मानाबादमध्येही होणार प्रयोग