राज्यातील 4 महापालिकांवर महायुतीची सत्ता, पण महापौरांच्या नावावर शिक्कामोर्तब कधी? नवीन अपडेट समोर
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत आज जाहीर होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर महायुतीची विशेष बैठक होणार असून, त्यानंतरच मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीच्या महापौरांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होईल

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि मुंबई या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर विराजमान होणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र महापौरपदी कोण विराजमान होणार, शपथविधी कधी असणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागून लागली आहे. आता याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रात महायुतीने जिंकलेल्या महापालिकेच्या महापौरांची घोषणा ही येत्या रविवारनंतरच होणार असल्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर आहे. येत्या २५ जानेवारीला ते भारतात परणार आहेत. ते भारतात परतल्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होणार आहे. या विशेष बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे. सुरुवातीला महापौरपदाच्या वाटपावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात पेच निर्माण होण्याची चिन्हे होती. दोन्ही पक्षांनी आपापल्या बालेकिल्ल्यात सत्तेसाठी दावा केला होता. मात्र, ताज्या आकडेवारीनुसार एकनाथ शिंदे यांनी आपली पकड अधिक मजबूत केली आहे.
स्थानिक राजकारणाची सूत्रे पूर्णपणे महायुतीच्या हाती
कल्याण-डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी ५३ शिवसेना नगरसेवक आणि ५ मनसे नगरसेवक अशा एकूण ५८ जणांची युती घडवून आणली आहे. या गणितामुळे सत्तेत समान वाटा मागणाऱ्या भाजपवर दबाव वाढला असून शिंदे गटाचे पारडे जड झाले आहे. ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेच्या ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेचाच (शिंदे गट) महापौर बसणार याची आता केवळ औपचारिकता उरली आहे. कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर या दोन्ही शहरांमध्ये ५५ हून अधिक नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याने स्थानिक राजकारणाची सूत्रे पूर्णपणे महायुतीच्या हाती आली आहेत.
दरम्यान मुंबईसह राज्यातील २८ महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी काढली जाणार आहे. या लॉटरी प्रक्रियेत महापौरपद नेमके कोणत्या प्रवर्गासाठी (उदा. खुला प्रवर्ग, महिला, अनुसूचित जाती/जमाती किंवा ओबीसी) राखीव होते. यावर उमेदवारांची निवड अवलंबून असेल. आरक्षण जाहीर होताच महायुतीकडून अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल, असे बोललं जात आहे.
मुंबईत एक उच्चस्तरीय बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसवरून परतल्यानंतर मुंबईत एक उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीत केवळ महापौरांच्या नावांवरच नव्हे, तर महायुतीमधील जागावाटप आणि सत्तेच्या समतोलावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. महायुतीमधील समन्वय टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही नेते कोणता सुवर्णमध्य काढतात, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
