धो-धो बरसल्यानंतर आता परतीच्या प्रवसाला अनुकूल वातावरण, परतीच्या प्रवसात शेतकऱ्यांचा फायदा की तोटा?

कोकणातील पालघर, रायगड रत्नागिरी तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये 20 सप्टेंबरपर्यंत पाऊस होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतरच परतीच्या पावसाला सुरवात होणार आहे.

धो-धो बरसल्यानंतर आता परतीच्या प्रवसाला अनुकूल वातावरण, परतीच्या प्रवसात शेतकऱ्यांचा फायदा की तोटा?
मान्सून आता परतीच्या वाटेवर आहे.
| Updated on: Sep 18, 2022 | 3:13 PM

पुणे : यंदाच्या (Monsoon Season) मान्सूनमध्ये शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा काय असतो, याची चांगलीच प्रचिती आली होती. (Kharif Season) हंगामाच्या सुरवातीपासून मान्सून अनियमित असाच राहिलेला आहे. त्यामुळे कही खुशी, कही गम असेच काहीसे चित्र असून आता त्याच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होत आहे. वायव्य भारतातील काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून माघारीसाठी (favorable environment) अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी 3 दिवसांमध्ये राजस्थानातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार आहे.

मान्सूनच्या प्रवासावरच राज्यातील पाण्याची आणि शेती व्यवसायाची स्थिती अवलंबून आहे. यंदा तर सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीलाच परतीच्या प्रवासासाठी वातावरण पोषक झाले होते. पण वायव्य भारतामध्ये पाऊस सुरुच राहिल्याने सप्टेंबरच्या सुरवातीला होणार प्रवासाला आता सुरवात होत आहे.

17 सप्टेंबर रोजीच मान्सून राज्यस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरवात करेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. पण अद्यापही त्याच्या प्रवासाला सुरवात झालेली नाही. गतवर्षी 6 ऑक्टोंबर रोजी याच परतीच्या प्रवासाला सुरवात झाली होती.

यंदा नियमित वेळेपेक्षा मान्सूनचे आगमन हे उशिरा झाले होते. हंगामाच्या सुरवातीलाच पावसाने दडी दिल्याने पेरण्या रखडल्या होत्या. आता परतीच्या प्रवासाला देखील उशिर होत आहे. मात्र, आगामी तीन दिवसांमध्ये मान्सून माघारी फिरेल असा अंदाज आहे.

यंदा निसर्गाचा लहरीपणा राहिलेला असला तरी जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने मान्सूनच्या परतीचा प्रवास केव्हा सुरु होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

20 सप्टेंबरपर्यंत राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे.

कोकणातील पालघर, रायगड रत्नागिरी तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये 20 सप्टेंबरपर्यंत पाऊस होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतरच परतीच्या पावसाला सुरवात होणार आहे.