बोंबला…! विमा अर्जांचे गठ्ठे थेट ऊसाच्या फडात, मदत मिळणार तरी कशी ?

नांदेडमध्ये अनोखाच प्रकार समोर आलाय. शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या प्रतिनीधीकडे भरुन दिलेले अर्ज थेट ऊसाच्या फडात आढळून आले आहेत. त्यामुळे विमा रक्कम देण्याची विमा कंपनीची किती मानसिकता आहे हे लक्षात येते. एक नव्हे...दोन नव्हे तर तब्बल 500 अर्ज हे ऊसाच्या फडात सापडले आहेत.

बोंबला...! विमा अर्जांचे गठ्ठे थेट ऊसाच्या फडात, मदत मिळणार तरी कशी ?
नांदेड जिल्ह्यातील आंतरगावात येथे शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज थेट ऊसाच्या फडात आढळून आले आहेत.

नांदेड : पीक विम्याची मदत (crop insurance) खात्यावर जमा झाली की नाही, याची चौकशी शेतकरी दिवसातून दोन वेळा करतोय…तलाठी, कृषी अधिकारी यांना सातत्याने विचारणा करतोय तर दुसरीकडे (Farmers’ Grievances) शेतकऱ्यांचे विमा अर्जच द्यापही विमा कंपनीकडे जमा झालेले नाहीत. प्रक्रियेत काम रखडले हे ठिक आहे. पण नांदेडमध्ये अनोखाच प्रकार समोर आलाय. शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या प्रतिनीधीकडे भरुन दिलेले अर्ज थेट ऊसाच्या फडात आढळून आले आहेत. त्यामुळे विमा रक्कम देण्याची विमा कंपनीची किती मानसिकता आहे हे लक्षात येते. एक नव्हे…दोन नव्हे तर तब्बल 500 अर्ज हे ऊसाच्या फडात सापडले आहेत. त्यामुळे कसली मदत आणि काय? शेतकऱ्याच्या परस्थितीचा चेष्टा केली जात असल्याची भावना आता व्यक्त होऊ लागली आहे.

नुकसानभरपाईसाठी पूर्वसूचना करताना सूचनांचा पाऊस, शिवाय अर्जात चूक झाली तर परतावा मिळणार नाही अशी समज शेतकऱ्यांनाच दिली जाते, मात्र, पीक विमा कंपनीकडून किती अंधाधुंद कारभार होतोय याचा प्रत्यय नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालु्क्यातील आंतरगाव येथे आला आहे. शिवाय नुकसानभरपाईत आपली नोंद करावी म्हणून या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसेही घेतले असल्याचा आरोप आहे.

नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. यातच विमा कंपनीचा मनमानी कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर बेतणारा आहे. पंचनामे होऊल आठ ते दहा दिवसाचा कालावधी लोटलेला आहे. गावागावात चर्चा आहे ती नुकसानभरपाई केव्हा मिळेल याची. मात्र, आंतरगावच्या शेतकऱ्यांचे अर्ज अजूनही शिवारातच असल्याने मदत मिळणार तरी कशी असा सवाल उपस्थित होत आहे.

नेमके प्रकरण समोर आले कसे?

सध्या पावसाने उघडीप दिल्याने आंतरगावचे शेतकरी किसन बाबाराव शिंदे हे आपल्या शेतामध्ये पीक पाहणीसाठी गेले होते. त्यांनी ऊसाची पाहणी केली आणि ऊसाच्या फडातून परतत असताना त्यांना कागदाचा गट्टाच दिसला. त्यांनी तो उकलून पाहिला असता हे सर्व पीकविम्याचे अर्ज असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बरं हे काही जुने नव्हते तर गत महिन्यातच पीकाचे नुकसान झाले होते तर आठ दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या प्रतिनीधीकडे जमा केलेले होते.

मागणी कारवाईची, बोळवण चौकशीची

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मोडकळीस आलेला आहे. अशात विमा कंपनी आणि सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. पण ही मदत तर दूरच पण हक्काच्या पैशासाठीही यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर येत आहे. पीकविम्याचे अर्जच गहाळ केले जात असले तर मदत काय मिळणार ? त्यामुळे संबंधितावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांनी सांगितले आहे.

नुकसानभरपाईचे काय होणार

या संबंधित शेतकऱ्यांचे पंचनामे केले जाणार आहेत. कोणताही शेतकरी हा पीकविम्यापासून वंचित राहणार नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक यांनी सांगितले आहे. हा प्रकार नांदेड येथे उघडकीस आला आहे पण असे प्रकार इतर गावांमध्येही घडत आहेत. शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झालेले आहे. पण विमा रक्कम अदा करुनही शेतकऱ्यांना पैसे देण्याची मानसिकता ही पीकविमा कंपन्यांची नाही. (Insurance applications in farmers’ fields, how will farmers get help?)

संबंधित बातम्या :

पीक नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा ; दिवाळीच्या आगोदर की नंतर ?

औषधी वनस्पतींची शेती, हजारोंची गुंतवणूक अन् लाखोंची कमाई

रब्बीतील मोहरीचे पीक ; पेरणीपासून काढणीपर्यंतचे मार्गदर्शन

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI