शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ! कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार? थेट कृषी मंत्र्यानेच दिली गुड न्यूज
Dattatray Bharane : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झालेली आहे, त्यानंतर आता शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा लागला आहे. अशातच आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुसऱ्या यादीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी राज्यातील इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. भरणे यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच जाहीर होणार – भरणे
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले की, कर्जमाफीची यादी आम्ही जाहीर केली आहे. केवायसीचे काम सुरु आहे. जे शेतकरी इनकम टँक्स भरतात त्यांची यादी आणि केवायसीचे काम दोन-तीन दिवसात पूर्ण होईल. कर्जमाफीची दुसरी यादीही लवकर जाहीर होईल. मुख्यमंत्र्यांचे यासाठी आभार मानतो कुठलीही निवडणूक नसतांना त्यांनी या कर्जमाफीला मंजूरी दिली आहे.
सगळे शेतकरी समाधानी होणार नाहीत – भरणे
पुढे बोलताना भरणे यांनी म्हटले की, ‘सगळे शेतकरी समाधानी होणार नाहीत. जास्तीत शेतकरी समाधानी कसे होतील यावर भर देण्यात येत आहे. कर्जमाफीची रक्कम मिळताना जिल्हा बँकेबाबत कुठलीही अडचण नाही. विषय फक्त राष्ट्रीयकृत बँकेचा आहे. शेतकऱ्यांनी कुठलीही काळजी करु नये. शेतकऱ्यांनी थोडं थांबाव. शेतकरी निश्चित अडचणीत आहे पण सरकार शेतकऱ्यासोबत आहे. ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी आहे. आयटीआर भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नाही. गरीब शेतकऱ्यांना उभं कर्जमाफी आहे. वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहीजे असे आम्हाला वाटते.
90 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या – भरणे
पावसाबाबत बोलताना भरणे यांनी म्हटले की, ‘काही ठिकाणी पाऊस पडतोय, पण आणखी पावसाची आम्हाला अपेक्षा आहे. 90 टक्के पेरण्या झाल्या आहेत, विदर्भात 87 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, शेतकऱ्यांना बाजारपेठ कशी मिळेल याचा आम्ही विचार करत आहोत.’ दरम्यान, एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा कमी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.