150 साखर कारखाने अन् 1 कोटी 32 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

| Updated on: Nov 23, 2021 | 4:48 PM

महिन्याभरात राज्यात 149 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले आहे. या गाळपातून 1 कोटी 32 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन मिळालेले आहे. यंदा साखरेचा उतारा कमी असला तरी विक्रमी उत्पादन होणार असल्याचा दावा केला जात आहे. ऊसाचे क्षेत्र वाढल्यामुळे हे शक्य असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातून यंदाही साखरेची निर्यात वाढणार आहे.

150 साखर कारखाने अन् 1 कोटी 32 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
साखर कारखान्याचे संग्रहीत छायाचित्र
Follow us on

पुणे : ऊसाचा गळीत हंगाम सुरु झाल्यापासून चर्चा आहे ती थकीत एफआरपी रकमेची. एकीकडे एकरकमी एफआरपी रक्कम देण्याची मागणी सुरु आहे तर दुसरीकडे ऊसाचे गाळप हे सुरुच आहे. अशा परस्थितीमध्ये गेल्या महिन्याभरात राज्यात 149 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले आहे. या गाळपातून 1 कोटी 32 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन मिळालेले आहे. यंदा साखरेचा उतारा कमी असला तरी विक्रमी उत्पादन होणार असल्याचा दावा केला जात आहे. ऊसाचे क्षेत्र वाढल्यामुळे हे शक्य असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातून यंदाही साखरेची निर्यात वाढणार आहे.

साखर आयुक्तांच्या आदेशानंतर राज्यातील गाळप हंगाम हा 15 ऑक्टोंबर रोजी सुरु झाला होता. मात्र, अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम अदा न केल्यामुळे त्यांना परवाना नाकारण्यात आला होता. असे असताना राज्यात केवळ एका महिन्याच्या कालावधीत गाळप वाढले असून सध्या 150 साखर कारखान्यांची धुराडी पेटलेली आहे.

पाच दिवसांमध्ये 11 साखर कारखान्यांना परवाने

एफआरपीच्या रकमेवरुन राज्यातील अनेक साखर कारखान्यांना परवानेच अदा करण्यात आले नव्हते. मात्र, परिसरात कारखान्याची प्रतिष्ठा आणि शेतकऱ्यांचा ऊस फडातच राहत असल्याने आपले राजकीय स्वार्थ साधत गेल्या 5 दिवसांमध्ये 11 साखर कारखान्यांनी परवाने घेतलेले आहेत. त्यामुळे 139 वरील साखर कारखान्यांचा आकडा आता 150 वर गेलेला आहे. त्यामुळे देखील ऊसाचे गाळप वाढणार आहे. मात्र, साखर आयुक्तालयाच्या भूमिकेमुळे एफआरपी रक्कम वसुल होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसाही मिळणार आहे.

सर्वाधिक गाळप कोल्हापूर विभागात

ऊसाचे सर्वाधिक गाळप हे कोल्हापूर विभागात झाले आहे. या भागात ऊसाचे क्षेत्र तर अधिकचे आहेच. शिवाय पूर्ण क्षमतेने गाळप सुरु आहे. तर सर्वात कमी गाळप हे अहमदनगर जिल्ह्यात झाले आहे. येथील कारखान्यांकडे अधिकची एफआरपी रक्कम थकीत असल्याने त्यांना परवानाच देण्यात आलेला नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या हीतासाठी परवानाविना साखर कारखाने सुरु केल्याचा दावा येथील संचालकांनी केला होता. त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता मात्र, प्रत्यक्षात कोणतीच कारवाई ही झालेली नाही.

राज्यात 150 साखर कारखाने सुरु

राज्यात 150 साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊसाचे गाळप सुरु आहे. यामध्ये खासगी कारखान्यांचाही सहभाग आहे. आतापर्यंत 1 कोटी 49 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप पूर्ण करण्यात आले असून भविष्यात गाळप वाढेल असा विश्वास व्यक्त होत आहे. मध्यंतरी अवकाळी पावसामुळे गाळपास अडचणी निर्माण झाल्या होत्या तर गाळप करणाऱ्या कारखान्यांची संख्याही कमीच होती. पण आता पूर्ण क्षमतेने गाळप सुरु असून यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचा विश्वास साखर आयुक्त यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

सोयाबीन उडदाच्या बरोबरीने, दिवाळीनंतर तब्बल अडीच हजाराने दरात वाढ

भात शेतीवरील संकट कायम, पावसामुळे शेतकऱ्यांची मेहनत अन् पीक पाण्यातच

खरिपात नुकसान झालेलीच पिके आता ठरत आहेत फायद्याची, दोन महिन्यांमध्येच चित्र बदलले