20,000 भारतीयांनी खरेदी केल्या ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कार! दोन मॉडेल्सना सर्वाधिक पसंती
या प्रसिद्ध कंपनीने भारतात 20,000 इलेक्ट्रिक कार्सची डिलिव्हरी पूर्ण केली आहे. यामध्ये कंपनीच्या दोन मॉडेल्सचा सर्वात मोठा वाटा असून, या दोन्ही मॉडेल्सच्या 14,000 हून अधिक युनिट्स ग्राहकांपर्यंत पोहोचल्या आहेत.

भारतीयांनी सध्या इलेक्ट्रिक कार्सला पसंती दिली आहे. एकंदरीत अनेक EV गाड्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या स्पर्धेत अनेक कंपन्या आहेत. आता यामध्ये चीनची आघाडीची वाहन उत्पादक कंपनी BYD ने मोठी कामगिरी केली आहे. या कंपनीने भारतीय बाजारात आतापर्यंत तब्बल 20,000 इलेक्ट्रिक कार्सची डिलिव्हरी पूर्ण केली आहे. यात विशेष म्हणजे 10 हजारांवरून 20 हजार डिलिव्हरीचा टप्पा या कंपनीने अवघ्या एका वर्षाहून थोडा अधिक कालावधी गाठला आहे. 20 नोव्हेंबर रोजी कंपनीने या यशाची अधिकृत घोषणा केली. दिल्लीतील PPS BYD शोरूममध्ये एका ग्राहकाला कंपनीची 20,000 वी इलेक्ट्रिक कार सुपूर्द करण्यात आली. सप्टेंबर 2025 मध्ये BYD ने भारतात 10 हजार कार्सच्या डिलिव्हरीचा टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर कंपनीने वेगाने आपला ग्राहकवर्ग वाढवला आहे.
सध्या भारतीय बाजारात BYD च्या Atto 3, Sealion 7, Seal आणि eMax 7 या चार इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत.
Atto 3 आणि Sealion 7 ची सर्वाधिक क्रेझ
BYD च्या भारतातील एकूण विक्रीमध्ये दोन मॉडेल्सचा मोठा वाटा आहे. यामध्ये Atto 3 ही कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय इलेक्ट्रिक कार ठरली आहे. या SUV च्या आतापर्यंत 9,000 हून अधिक युनिट्सची डिलिव्हरी झाली आहे. दुसरीकडे, फेब्रुवारी 2025 मध्ये भारतीय बाजारात दाखल झालेल्या Sealion 7 या इलेक्ट्रिक SUV ला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या मॉडेलच्या 5,000 हून अधिक गाड्या ग्राहकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, या दोन्ही मॉडेल्सच्या मिळून 14 हजारांपेक्षा जास्त युनिट्सची विक्री झाली आहे. त्यामुळे BYD च्या एकूण 20 हजार डिलिव्हरीमध्ये या दोन कार्सचा सर्वात मोठा वाटा आहे. कंपनीच्या Seal इलेक्ट्रिक सेडान आणि eMax 7 या मॉडेल्सनाही बाजारात स्थान मिळाले आहे.
650 किमीपर्यंतची रेंज आणि दमदार परफॉर्मन्स
BYD च्या इलेक्ट्रिक कार्सची खासियत म्हणजे त्यांची रेंज आणि परफॉर्मन्स. कंपनीच्या विविध मॉडेल्समध्ये ग्राहकांना वेगवेगळे पर्याय मिळतात. BYD Sealion 7 ही प्रीमियम इलेक्ट्रिक SUV असून, तिच्या Performance व्हेरिएंटमध्ये अवघ्या 4.5 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठण्याची क्षमता आहे. तर BYD Atto 3 ही स्पोर्टी इलेक्ट्रिक SUV असून, तिला 521 किमीपर्यंतची ARAI प्रमाणित रेंज मिळते. याशिवाय या कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफसारखे प्रीमियम फीचर्सही देण्यात आले आहेत.
BYD Seal ही कंपनीची प्रीमियम इलेक्ट्रिक सेडान आहे. तिच्या आकर्षक फास्टबॅक डिझाइनमुळे ही कार रस्त्यावर वेगळी ओळख निर्माण करते. Seal च्या Premium व्हेरिएंटमध्ये 650 किमीपर्यंतची NEDC प्रमाणित रेंज मिळते. तर Performance व्हेरिएंटला केवळ 3.8 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडता येतो.
मात्र, या सर्व कार्सची रेंज आणि फीचर्स व्हेरिएंटनुसार बदलतात. तसेच ARAI आणि NEDC या वेगवेगळ्या चाचणी पद्धती असल्याने त्यांच्या रेंजच्या आकड्यांची थेट तुलना करता येत नाही.
40 शहरांमध्ये 51 शोरूम्सचे जाळे
भारतातील वाढती मागणी लक्षात घेता BYD ने आपल्या विक्री आणि सेवा नेटवर्कचाही विस्तार केला आहे. सध्या कंपनी देशातील 40 शहरांमध्ये एकूण 51 शोरूम्स चालवत आहे.