
यावर्षी क्रेटा इलेक्ट्रिक भारतीय बाजारपेठेत लाँच करून धुमाकूळ घालणाऱ्या ह्युंदाई मोटर इंडियाने येत्या 4-5 वर्षांत भारतीय कार बाजारपेठेत ईव्हीचा वाटा 10 टक्क्यांहून अधिक असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
ह्युंदाईच्या 3 नवीन ईव्ही लवकरच येणार
ह्युंदाई मोटर इंडिया येत्या काळात 3 नवीन बॅटरी इलेक्ट्रिक मॉडेल्स आणण्याची योजना आखत आहे. कंपनी चार्जिंग स्टेशन वाढवण्यावरही काम करत आहे. कंपनी पुढील 7 वर्षांत देशभरात 600 सार्वजनिक फास्ट चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. गर्ग म्हणाले की, देशात पुढे जाण्यासाठी ईव्ही हाएकमेव मार्ग आहे हे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वी ईव्ही, हायब्रीड किंवा इतर कोणतेही तंत्रज्ञान पुढे जाईल की नाही हे स्पष्ट नव्हते. पण आता सरकारची धोरणे ईव्हीच्या बाजूने आहेत.
ईव्ही सेगमेंटमध्ये बड्या कंपन्यांचा प्रवेश
वृत्तसंस्थेशी बोलताना गर्ग म्हणाले की, ह्युंदाई, महिंद्रा आणि टाटा मोटर्ससारख्या मोठ्या कंपन्या आधीच ईव्ही बनवत आहेत. आता मारुती सुझुकीदेखील या सेगमेंटमध्ये येत आहे. यावरून ईव्हीची व्याप्ती आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. गर्ग म्हणाले की, 2030 पर्यंत ईव्हीचा वापर सातत्याने वाढण्याची अपेक्षा आहे. पुढील चार ते पाच वर्षांत ईव्हीचा वाटा 2.5 टक्क्यांवरून 12-13 टक्क्यांपर्यंत वाढेल. हे क्षेत्र यापुढेही वाढत राहील.
कमी किमतीच्या इलेक्ट्रिक कारवर भर
तरुण गर्ग म्हणाले की, सरकारच्या चांगल्या धोरणांमुळे आणि चार्जिंग स्टेशनमध्ये वाढ झाल्यामुळे आता प्रत्येकजण ईव्हीबद्दल बोलू लागला आहे. ह्युंदाई काय करत आहे हे स्पष्ट करताना गर्ग म्हणाले की, ते तीन नवीन बॅटरी इलेक्ट्रिक मॉडेल्स आणण्याची योजना आखत आहेत. चार्जिंग स्टेशन वाढवण्यावरही ते काम करत आहेत.
गर्ग म्हणाले की, भारतात पुरवठा साखळी तयार करणे आणि चार्जिंग स्टेशन वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही ईव्हीसाठी पूर्णपणे तयार आहोत. आम्हाला भारतातील ईव्हीच्या भवितव्याबद्दल विश्वास आहे. ह्युंदाई भारतात आपल्या ईव्ही मॉडेल्सची किंमत कमी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. सेल, बॅटरी पॅक, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि ड्राइव्हट्रेन यासारख्या आवश्यक भागांचे उत्पादन भारतात करण्याची कंपनीची योजना आहे.
ह्युंदाईने या वर्षाच्या सुरुवातीला क्रेटाचे इलेक्ट्रिक मॉडेल सादर केले होते. कंपनी दर महिन्याला सुमारे 1,000 युनिट्सची विक्री करते. याशिवाय कंपनी आयनिक 5 नावाचे आणखी एक महागडे इलेक्ट्रिक मॉडेल विकते. मार्चमध्ये क्रेटाची विक्री 18,059 युनिट्स होती. देशांतर्गत प्रवासी वाहन बाजारात हे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल ठरले आहे.
गर्ग म्हणाले की, लोक एसयूव्हीला अधिक पसंती देत आहेत. ते म्हणाले की, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एसयूव्हीचा वाटा 63.2 टक्क्यांवरून 68.5 टक्क्यांवर गेला आहे. वर्षभरात हा आकडा 70 टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे.