पेट्रोलच्या किमतीचं टेन्शन आता संपणार! 100% इथेनॉलवर चालणाऱ्या ‘इनोव्हा’ची नितीन गडकरींनी केली घोषणा
Toyota Innova HyCross Flex-Fuel: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 100% इथेनॉलवर चालणाऱ्या 'इनोव्हा'ची माहिती दिली आहे. ही गाडी या महिन्यात येऊ शकते.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ‘इनोव्हा’चे ‘फ्लेक्स-फ्यूल’ मॉडेलबद्दल माहिती सोमवारी दिली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गाडी पूर्णपणे E100 अर्थात १०० टक्के इथेनॉल वर चालण्यास सक्षम असेल. यामुळे पेट्रोलच्या दारांचे टेन्शन आता गेले आहे. एका कार्यक्रमात बोलताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पश्चिम आशियातील संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जीवाश्म इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होणे फार गरजेचं आहे. याशिवाय त्यांनी असेही सांगितलं की, पुढच्या वर्षापर्यंत देशात विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी किमान ३५-४० टक्के गाड्या इलेक्ट्रिक असतील. हा मोठा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
हरित हायड्रोजन भविष्यातील इंधन?
पुढे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, हरित हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असून भारत स्वच्छ हायड्रोजनचा निर्यातदार बनू शकतो. गेल्या महिन्यात, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘सेंट्रल मोटर व्हेइकल्स रूल्स’ मध्ये सुधारण करण्याबद्दल अधिसूचित केल्या आहेत. याच धर्तीवर E100 इंधनावर चालण्यास सक्षम असलेल्या ‘फ्लेक्स-फ्यूल’ वाहनांना मंजुरी देण्यात आली आहे. E100 इंधन वापरणारी वाहने जवळजवळ शुद्ध इथेनॉलवर चालू शकतात असेही सांगण्यात आले आहे.
विशेषतः डिझाइन केलेल्या गाड्या
रस्ते वाहतूक मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की, E20 किंवा सामान्य पेट्रोलवर चालण्यासाठी डिझाइन केलेली वाहने E85 किंवा E100 इंधनाचा वापर करू शकत नाहीत.ही तरतूद इतर वाहनांना लागू होणार नाही. जी वाहने E20 किंवा सामान्य पेट्रोलवर चालतात, ती E85 किंवा E100 इंधनाचा वापर करू शकत नाहीत.
मारुती सुझुकीने सादर केली देशातील पहिली ‘फ्लेक्स-फ्यूल’ कार!
मंत्रालयाने बदलांच्या कक्षेत येणाऱ्या हलक्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांसाठी कमाल वजन मर्यादा ३,००० किलोवरून वाढवून ३,५०० किलो केली आहे. या वर्षी जून महिन्यात, मारुती सुझुकी इंडियाने देशातील पहिली ‘फ्लेक्स-फ्यूल’ प्रवासी कार सादर केली. कंपनीने ‘वॅगन आर’ (Wagon R) ची फ्लेक्स-फ्यूल आवृत्ती आणली आहे, जी E20 ते E100 पर्यंतच्या इथेनॉल-मिश्रित इंधनावर चालू शकते.