१५ मिनिटांच्या चार्जिंगवर २५० किमीची रेंज, TATA ची खास इलेक्ट्रिक कार लाँच

टाटा मोटर्सने एक नवी इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. ही कार केवळ १५ मिनिटे चार्ज केल्यानंतर २५० किमी अंतर धावू शकते. या कारची किंमत जाणून घेऊयात.

१५ मिनिटांच्या चार्जिंगवर २५० किमीची रेंज, TATA ची खास इलेक्ट्रिक कार लाँच
| Updated on: Jun 03, 2025 | 5:57 PM

इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्सने एक नवी इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. टाटा हॅरियर ईव्ही असे या कारचे नाव आहे. केवळ १५ मिनिटे चार्ज केल्यानंतर २५० किमी अंतर धावू शकते. या कारमधील फीचर्स काय आहेत? या कारची किंमत किती आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

१५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २५० किमीची रेंज

टाटा हॅरियर ईव्ही ही एक खास एसयूव्ही आहे, ही कार ऑफ-रोडिंग क्षमतेमुळे खास बनते. या कारमध्ये QWD ड्युअल मोटर सेटअप आहे, ज्यामुळे आपण कार चालवताना रियर व्हील ड्राइव्ह आणि ऑल व्हील ड्राइव्ह असे पर्याय निवडू शकतो. या कारमध्ये तुम्हाला ११६ kW आणि १७५ kW बॅटरीचे पर्याय मिळतात. या कारचा पीक टॉर्क ५०४ Nm पर्यंत असेल. ही कार फक्त ६.३ सेकंदात ० ते १०० किमीचा वेग गाठू शकते. तसेच ही कार १५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २५० किमीची रेंज देते. तसेच या कारची फूल रेंज ६२७ किमी पर्यंत आहे.

कारमध्ये ७ एअरबॅग्ज मिळणार

या कारमध्ये तुम्हाला ६ ड्राईव्ह मोड मिळतात, त्यामुळे ही कार कोणत्याही प्रकारच्या हवामानात धावू शकते. या कारमध्ये सुरक्षेचीही खूप काळजी घेण्यात आलेली आहे. त्यात ७ एअरबॅग्ज आहेत. तसेच या कारमध्ये ई-व्हॅलेट पर्याय देण्यात आला आहे, जो कार स्वतः पार्क करु शकतो. त्याशिवाय या कारमध्ये ऑल-व्हील डिस्क ब्रेक, पार्किंग सेन्सर्स, हिल होल्ड असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग आणि ऑटो हेडलॅम्प्स सारखे फीचर्सही आहेत. या कारमध्ये सॅमसंग निओ क्यूएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात १४.५३ इंचाची हरमन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

टाटा हॅरियर ईव्हीची किंमत किती?

टाटा मोटर्सने जानेवारीमध्ये ऑटो एक्स्पोमध्ये ही कार सादर केली होती. या कारची किंमत २१.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. या कारचे बुकिंग २ जुलैपासून सुरू होणार आहे. या कारमध्ये ५०२ लिटरची बूट स्पेस आहे जी ९९९ लिटरपर्यंत वाढवता येते. ही कार एम्पॉवर्ड ऑक्साइड, प्रिस्टाइन व्हाईट आणि प्युअर ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे.