
दिवाळीच्या सणानिमित्त अनेक कंपन्यांमार्फत आपल्या कर्मचाऱ्यांना मिठाई, बोनस वा इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचे गिफ्ट देण्याची परंपरा नेहमी पाळली जाते. परंतू तुम्हाला बोनस म्हणून जर कंपनीने नवी कोरी कार दिली तर किती आनंद होईल ? गेल्या काही वर्षांमध्ये दिवाळी निमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना अशा कार बोनस म्हणून दिल्याचे तुम्ही वाचले असेल. आता चंदीगडच्या एका प्रमुख औषध कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार भेट दिली आहे. या कंपनीचे नाव Mits Healthcare Private Limited आहे.
एमआयटीएसने एकूण 51 कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर ही कार गिफ्ट केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कंपनी अशा प्रकारचे अनोखे गिफ्ट देत आली आहे. एमआयटीएसचे संस्थापक आणि सीईओ एम.के.भाटिया आहेत. कोण आहेत हे महादानशूर एम.के.भाटीया आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना ते कार गिफ्ट का देत आहेत ?
एम. के.भाटीया कोण आहेत ?
एम.के.भाटीया हे उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. मुझफ्फरनगरात ते एक मेडिकल स्टोर चालवतात. साल २००२ मध्ये त्यांना व्यवसायात मोठे नुकसान झाले आणि ते दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहचले होते. तेव्हा त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज होते. त्यानंतर २०१५ मध्ये ते चंदीगडला आले. येथे त्यांनी औषध कंपनी सुरु केली. आता त्यांच्याकडे १२ कंपन्या आहेत.
कार का गिफ्ट केली ?
दैनिक भास्करच्या बातमीनुसार एमआयटीएस हेल्थकेअरचे सीईओ एम.के. भाटीया यांनी सांगितले की ते त्यांच्या स्टाफला बाईक वा ऑटो ऐवजी कारमधून प्रवास घडवू इच्छीत होते. गेल्या तीन वर्षांपासून ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार भेट देत आहेत. ते म्हणाले की जर माझे स्वप्न साकार झाले असेल तर कर्मचाऱ्यांचे स्वप्नही साकार व्हायला नको का ?
तीन वर्षांपासून कार गिफ्ट देत आहेत
गेल्या दोन वर्षांपासून एम.के. भाटीया आपल्या कर्मचाऱ्यांना वाहन गिफ्ट करत आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यांनी २५ कार गिफ्ट केल्या आहेत. गेल्या दिवाळीला त्यांनी कर्मचाऱ्यांना १३ वाहने गिफ्ट केली. त्याआधीच्या वर्षी त्यांनी १२ कर्मचाऱ्यांनी कार गिफ्ट केली होती.