अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी चांगली संधी आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे ही आता शहाणपणाची गुंतवणूक झाली आहे. 2019 मध्ये 31,729 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने खरेदी केलेल्या सोन्याने आतापर्यंत 200 टक्के नफा दिला आहे. सोन्याची किंमत 1.10 लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

कल्पना करा की, तुम्ही 2019 च्या अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केले असते, जेव्हा किंमत 31,729 रुपये प्रति 10 ग्रॅम होती, तेव्हा तुम्ही आज जवळजवळ 200 टक्के नफा कमावला असता. गेल्या वर्षी म्हणजेच 2024 च्या अक्षय तृतीयेशी तुलना केली तर सोन्याचा भाव 73,240 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तो आतापर्यंत 30 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. सोन्याच्या परताव्याचे हे आकडे व्हेंचुरा सिक्युरिटीजनुसार आहेत.
10 वर्षांत सोन्याच्या दरात 68,500 रुपयांची वाढ
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या अहवालानुसार 2015 ते 2025 दरम्यान म्हणजेच 10 वर्षांत सोन्याच्या किंमतीत 68,500 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. म्हणजेच अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ तर आहेच, शिवाय दीर्घकाळात आपल्या गुंतवणुकीला ही दमदार परतावा दिला आहे.
हलके दागिने आणि नाणी खरेदी
सोन्याचा भाव 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास पोहोचला आहे, परंतु अक्षय तृतीया 2025 साठी ग्राहकांचा उत्साह अजूनही जोरदार आहे. रिद्धी सिद्धी बुलियन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज कोठारी म्हणतात की, सोन्याच्या चढ्या किमतीमुळे ग्राहकांचे वर्तन बदलले आहे. आता लोक जड सोन्याच्या दागिन्यांऐवजी हलके दागिने आणि नाणी खरेदी करत आहेत.
कोठारी म्हणाले की, दक्षिण भारतातील लोकांसाठी हा सण खूप खास आहे. त्यामुळे आजकाल खरेदीसाठी दुकानांमध्ये जास्त लोक पोहोचत आहेत. पण सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे, त्यामुळे लोक आता जड आणि महागड्या दागिन्यांऐवजी हलके दागिने किंवा लहान सोन्याची नाणी घेण्यास प्राधान्य देत आहेत.
सराफा व्यावसायिकांची ती ट्रीक
सोन्याच्या वाढत्या किमतीला सामोरे जाण्यासाठी ज्वेलर्सही नवनवीन युक्त्या अवलंबत आहेत. दागिन्यांचे नवे डिझाईन आणत आहेत, मेकिंग चार्जेसवर सूट देत आहेत आणि ग्राहकांना जुने दागिने बदलून नवीन दागिने देण्याचा पर्यायही देत आहेत. विकल्या जाणाऱ्या सोन्याचे प्रमाण थोडे कमी असले तरी त्याचे भाव जास्त असल्याने एकंदर विक्री मूल्य कमी होत नसून वाढू शकते. सोने खरेदीसाठी लोक अजूनही उत्सुक असल्याचे स्पष्ट झाले असून ज्वेलर्सही ग्राहकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन आपल्या ऑफरमध्ये बदल करत आहेत.
सोन्याचा भाव 1.10 लाखांच्या घरात
अॅक्सिस सिक्युरिटीजच्या कमॉडिटी रिसर्चचे वरिष्ठ विश्लेषक देवया गगलानी सांगतात की, सणासुदीच्या दिवशी सोनं खरेदी करायचं असेल तर एकाच वेळी जास्त खरेदी करू नका. त्याऐवजी थोडी थोडी खरेदी करणे चांगले ठरेल. ते म्हणाले, ‘सध्या सोन्याचे भाव खूप वाढले आहेत आणि थोडे महाग झाले आहेत. येत्या काही दिवसांत 5 ते 10 टक्क्यांनी भाव घसरले तर हळूहळू खरेदी करणे शहाणपणाचे ठरेल. सध्याच्या किमतीत जोखीम थोडी जास्त आहे, कारण परतावा तितकासा चांगला दिसत नाही.
तेजीचा कल असाच कायम राहिला आणि सोन्याचे दर 1,00,000 रुपयांच्या वर कायम राहिले तर पुढील अक्षय्य तृतीयेपर्यंत तो 1,10,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. त्याचबरोबर किंमत कमी झाली तर जवळपास 87,000 रुपये थांबू शकतात.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने सोने गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीसाठी ‘बाय ऑन डिप’चे धोरण अवलंबण्याचा सल्ला दिला आहे. 90,000-91,000 रुपयांच्या पातळीवर सोन्याला भक्कम आधार आहे आणि दीर्घकाळात त्याची किंमत 1,06,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा त्यांचा विश्वास आहे.
दिल्ली-मुंबईत सोन्याचे दर
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 87,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 10,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 89,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 97,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
