
शेअर बाजारातील पडझड थांबण्याचं नाव घेत नाहीय. भारतीय शेअर बाजारात मागच्या आठवड्यात मोठी घसरण दिसून आली. आज सोमवारी शेअर बाजार लाल निशाणीसह उघडला. मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअर्सचा सेंसेक्स बाजार उघडताच 500 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. निफ्टी 159 अंक घसरणीसह उघडला. सुरुवातीच्या सत्रातच लार्जकॅपमधील 30 पैकी 29 शेअर्सची सुरुवात घसरणीसह झाली. सर्वात जास्त घसरण Zomato च्या शेअर्समध्ये दिसून आली. शेअर बाजारावर पुन्हा एकदा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ लावण्याच्या धमकीचा परिणाम दिसून आला.
BSE सेन्सेक्स मागच्या आठवड्यात 75,311.06 अंकावर बंद झालेला. सोमवारी तो घसरणीसह 74,893.45 अंकांवर उघडला. काहीवेळात घसरण वाढली. सेन्सेक्स कोसळून 74,730 या स्तरावर पोहोचला. दुसऱ्याबाजूला निफ्टी मागच्या आठवड्यात 22,795.90 अंकांवर बंद झालेला. तो 22,609.35 च्या लेवलवर ओपन झाला. काही मनिटात निफ्टीने सेन्सेक्सच्या पावलावर पाऊल टाकत 200 अंकांच्या घसरणीसह 22,607 पर्यंत घसरला.
किती लाख कोटींचा फटका?
शेअर बाजारात घसरणं इतकी वेगात झाली की, 5 मिनिटात BSE मधील लिस्टेड कंपन्यांच्या एकूण मार्केट कॅपमध्ये 3.40 लाख कोटी रुपयाची घट झाली. ग्लोबल मार्केटमध्ये घसरण सुरु असताना आता ब्रॉडर मार्केटमध्येही अस्थिरतेची स्थिती आहे. BSE चे सर्व सेक्टोरल इंडेक्स लाल निशाणीवर व्यवहार करत आहेत. सकाळी 9.20 मिनिटांनी BSE मधील लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप कमी होऊन 3.40 लाख कोटी रुपयांवर आली.
गुंतवणूकदारांची नजर कशावर असेल?
ट्रम्प टॅरिफ आणि ग्लोबल बाजाराच्या स्थितीशिवाय गुंतवणूकदारांची नजर काही महत्त्वाच्या आर्थिक आकड्यांवर आहे. जे बाजाराची दशा आणि दिशा ठरवतील. दोन दिवसांनी 26 फेब्रुवारीला अमेरिकेत होम सेल्सचा डाटा जारी होणार आहे. 27 फेब्रुवारीला अमेरिकेत GDP ग्रोथचा अंदाज लावला जाईल. 28 फेब्रुवारीला भारत सरकार चालू वित्त वर्ष (2024-25) ची तिसऱ्या तिमाहीसाठी GDP डेटा आणि आगामी आर्थिक वर्षासाठी GDP चा अंदाज जाहीर करेल. या आकड्यांवर गुंतवणूकदारांची नजर असेल.