प्रियांका गांधींच्या लेकाच्या साखरपुड्याची लगबग, कुठं होणार कार्यक्रम; लोकेशन समजात चकित व्हाल!
प्रियांका गांधींचा लेक रेहान वाड्रा जानेवारी २०२६ मध्ये गर्लफ्रेंड अवीवा बेगशी साखरपुडा करणार असल्याचे म्हटले जात आहे. अवीवा दिल्लीची एक व्यावसायिक फोटोग्राफर, प्रोडक्शन हाउसची सह-संस्थापक आणि माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू आहेत. २५ वर्षीय रेहान वाड्रा एक इंस्टॉलेशन आणि विज्युअल आर्टिस्ट आहेत. आता त्यांचा साखरपुडा कुठे होणार चला जाणून घेऊया...

कॉंग्रेस पक्षाच्या महासचिव तसेच खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांचा लेक रेहान वाड्रा हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. रेहान गर्लफ्रेंड अविवाशी लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. मंगळवारी प्रियांका गांधी आपल्या कुटुंबासह राजस्थानातील सवाई माधोपुर येथील रणथंभौर राष्ट्रीय उद्यानात पोहोचल्या आहेत. येथे त्या नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करणार आहेत. त्या दुपारी सुमारे १२:३० वाजता पोहोचल्या आहेत. पुढचे चार दिवस त्या पाचतारांकित लक्झरी रिसॉर्ट शेर बागमध्ये मुक्काम करणार आहेत. दरम्यान, येथेच रेहानचा साखरपुडा होणार असल्याचे म्हटले जात आहे.
कुठे होणार साखरपुडा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधींच्या मुलाचे रेहान राजीव वाड्राचा दीर्घकालीन गर्लफ्रेंड अवीवा बेगशी साखरपुडा होण्याची शक्यता आहे. त्यासाठीच कुटुंब येथे एकत्रित झाले असल्याची चर्चा सुरु आहे. हा संपूर्ण सोहळा अतिशय खाजगी असल्याचे सांगितले जात आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी, त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि इतर कुटुंबीय यामध्ये सहभागी होणार आहेत. रेहान वाड्रा याआधीच रणथंभौरला पोहोचला आहे.
सूत्रांनी सांगितले की, रेहानने अलीकडे अवीवाला प्रपोज केले, ज्याला दोन्ही कुटुंबांची संमती मिळाली आहे. त्यामुळे रणथंभौर येथे साखरपुडा समारंभ आयोजित केला गेला असू शकतो. अवीवा दिल्लीत लहानाची मोठी झाली आहे आणि दोघे सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
रणथंभौर गांधी कुटुंबाचे आवडते ठिकाण राहिले आहे. प्रियांका गांधी येथे अनेकदा खाजगी भेटींवर आल्या आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५, २०२४ आणि २०२३ मध्ये त्या येथे आल्या होत्या. त्यांनी येथे टायगर सफारीचा आनंद घेतला आणि कुटुंबासह वेळ घालवला. त्याचप्रमाणे राहुल गांधीही या वर्षी दुसऱ्यांदा येथे आले आहेत.
गांधी कुटुंबीय २ जानेवारी २०२६ पर्यंत येथे थांबणार आहे. सर्व कुटुंबीय सफारी टूरद्वारे टायगर साइटिंगचा आनंद घेणार आहेत. अद्याप गांधी-वाड्रा कुटुंब किंवा कॉंग्रेसकडून साखरपुड्याबाबत कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. त्यामुळे रेहान आणि अविवा यांचा खरच साखरपुडा होणार आहे का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेय
