शेवटच्या क्षणी घात झाला… मुलीला तिकीट नाकारल्याचं कळताच आईला हार्ट अटॅक, तातडीने रुग्णालयात दाखल; या पक्षाशी कनेक्शन…
Mira Bhayandar Municipal Corporation Election : मिरा-भाईंदरमध्ये मुलीला तिकीट नाकारल्याचं कळताच आईला हार्ट अटॅक आल्याचे समोर आले आहे. या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे आज उमेदवारी मिळालेल्या आणि उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांनीही अपक्ष किंवा पक्षांतर करत अर्ज दाखल केलेला आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी नाकारल्यामुळे उमेदवारांनी गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. तर काही ठिकाणी बंडखोरी पहायला मिळत आहे. अशातच आता मिरा-भाईंदरमध्ये एका महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
वनिता बने यांना हृदयविकाराचा झटका
मिरा भाईंदर महानगर पालिकेसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटचा दिवस होता. भाईंदरमध्ये श्रद्धा बने यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र आता त्यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. याचा धक्का बसल्याने श्रद्धा यांच्या आई माजी महिला जिल्हा अध्यक्ष वनिता बने यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तात्काळ मीरा रोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती आत्ता स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
जळगावमध्ये राडा
जळगावमध्ये अनेक इच्छुक उमेदवारांना तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यामुळे भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार सुरेश भोळे यांना या इच्छुकांनी घेराव घातला होता. आमदार सुरेश भोळे यांच्याशी चर्चा करताना अनेक इच्छुक उमेदवारांना अश्रू अनावर झाले होते. तारा पटेल, संगीता पाटील आणि विठ्ठल पाटील या प्रभाग क्रमांक 1 मधील इच्छुक उमेदवारांच्या डोळ्यात पाणी आले होते. हुंदके देत रडत रडत, हात जोडून उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांनी आमदार सुरेश भोळे यांना विनवणी केली. यावेळी युती न करता निवडणूक लढवण्याची मागणीही या इच्छुक उमेदवारांची केली. असे न केल्यास पुढच्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला त्रास होईल, असा इशारा आमदार सुरेश भोळे यांना देण्यात आला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिलेला अश्रू अनावर
जळगाव महापालिकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवार कलाबाई शिरसाठ यांनाही अश्रू अनावर झाले होते. कमलाबाई प्रभाग क्रमांक 10 मध्ये उमेदवारीसाठी इच्छुक होत्या, मात्र युतीतील ठाकरे गटाकडून चारही उमेदवारांनी AB फॉर्म सह अर्ज भरल्याने कलाबाई शिरसाठ यांनी संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आपल्याला AB फॉर्म दिला नाही तरी आपण अपक्ष निवडणूक लढवणार अस देखील कलाबाई शिरसाठ यांनी म्हटले होते.
