Afganistan vs Pakistan : अफगाणिस्तान-पाकिस्तानमधील दुश्मनी भारतीय शेतकऱ्यांच्या पथ्यावर, बिझनेसमध्ये होणार मोठा फायदा
Afganistan vs Pakistan : अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील शत्रुत्वाची भावना दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रणनितीक दृष्टीकोनातून भारताला याचा फायदा आहेच. पण या दुश्मनीमुळे बिझनेस मध्येही भारताला आता मोठा फायदा होणार आहे.

कधी काळी परस्परांचे खूप चांगले मित्र असलेले अफगाणिस्तान आणि पाकिस्तान आता कट्टर वैरी बनले आहेत. दोन्ही देशांकडून परस्परांवर हल्ले सुरु असतात. अलीकडे अनेकदा अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये सैन्य संघर्ष झाला आहे. आता नुकताच पाकिस्तानने अफगाणिस्तानात एअर स्ट्राइक केला. त्यात निष्पाप नागरिक मारले गेले. कतरने या दोन्ही देशात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण ही शत्रुत्वाची भावना काही संपत नाहीय. उलट हे वैर दिवसेंदिवस अधिकच वाढत चाललय. पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील ही दुश्मनी रणनितीक दृष्टया भारताच्या पथ्यावर पडणारी आहेच. पण आता बिझनेसमध्येही भारताला मोठा फायदा होणार आहे. अफगाणिस्तान आता भारताकडून थेट बासमती तांदूळ आयात करण्याच विचार करत आहे. पाकिस्तान सोबत तणावाचे संबंध असल्याने अफगाणिस्तानला पुरवठ्याचे जे आपले स्त्रोत आहेत, त्यात वैविध्य आणायचं आहे. म्हणून ते भारताकडून थेट आयातीचा विचार करत आहेत.
थेट बासमती तांदळाचा व्यवहार सुरु करण्यासाठी भारतीय निर्यातदार आणि अफगाणिस्तानचे आयतदार यांच्यात पुढच्या महिन्यात बैठक होण्याची शक्यता आहे. द हिंदूने हे वृत्त दिलं आहे. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या माध्यमातून मागच्या आठवड्यात दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. अफगाणिस्तानला वर्षाला 5 लाख टन बासमती तांदूळ लागतो. याच्या पुरवठ्यासाठी ते शेजारच्या पाकिस्तानवर अवलंबून आहेत. पण आता पाकिस्तानसोबत संबंधात तणाव निर्माण झाल्याने अफगाणिस्तानने पर्यायी पुरवठ्याची चाचपणी सुरु केली आहे. दोन्ही देशांमध्ये व्यवहारावर शिक्कामोर्तब झाल्यास भारताकडून त्यांना बासमती तांदळाचा पुरवठा सुरु होईल.
वाहतूक खर्चाची भर पडत आहे
नवी दिल्लीतील अफगाणिस्तानच्या राजनैतिक मिशनमधील प्रतिनिधी या चर्चेत सहभागी झाले होते. भारताकडून बासमती तांदळाची खरेदी वाढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. सध्या इराण आणि दुबई मार्गे भारतीय तांदूळ अफगाणिस्तानात पोहोचतो. पण यामध्ये वाहतूक खर्चाची भर पडत आहे. थेट व्यापार सुरु झाल्यास हा पैसा वाचेल.
अफगाणिस्तानातून भारताला सर्वाधिक निर्यात कसली होते?
इराणच्या अब्बास बंदरातून तांदूळ पाठवण्याचा एक प्रस्ताव विचाराधीन आहे. दोन्ही देशांच्या सरकारामध्ये काय ठरतं, यावर हे अवलंबून आहे. अफगाणिस्तानातून भारताला सुका मेवा म्हणजे ड्राय फ्रुटसची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. दोन्ही देशांमध्ये थेट करार झाल्यास अफगाणिस्तानच्या बाजारपेठेत भारतीय बासमतीची आवक वाढेल. शेतकऱ्यांसह अनेक घटकांना याचा थेट फायदा होईल. अफगाणिस्तानच्या बासमती बाजारपेठेवर पाकिस्तानचं वर्चस्व आहे.