
Donald Trump Tariff Bomb: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. रशियाकडून थेट कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ट्रम्प यांनी लगाम खेचण्याचा प्रयत्न केला आहे. हे देश एकप्रकारे तेल खरेदी करून रशियाला आर्थिक रसद पोहचवत असल्याचा आरोप ट्रम्प प्रशासनाने केला आहे. या हिटलिस्टवर भारत, चीन आणि ब्राझील हे देश आहेत. परदेशी माध्यमांच्या अहवालात अमेरिकेचे सीनेटर लिंडसे यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यानुसार अमेरिकेत द्विपक्षीय विधेयक मंजूर झाले आहे. ज्याचा वापर भारत, चीन आणि ब्राझील या देशांवर दबाव आणण्यासाठी करण्यात येणार आहे. या विधेयकानुसार या देशांना दंडित करण्यात येणार आहे. युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आता या देशांवर भारी भक्कम दंड आकारण्यात येणार आहे. या देशांवर 500 टक्के कर लादण्यात येणार आहे. ग्राहम यांनी संकेत दिले की पुढील आठवड्याच्या सुरुवातीला हे विधेयक मंजूर होईल. त्यासाठी मतदान होणार आहे.
ट्रम्प यांनी रशियावर प्रतिबंधाविषयीच्या विधेयकाला दिली हिरवी झेंडी
लिंडसे ग्राहम यांनी त्यांच्या एक्स हँडलवर याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार ट्रम्प यांनी रशियावरील प्रतिबंध विधेयकाला मंजूरी दिली आहे. सीनेटर ब्लूमॅथल आणि इतर काही सीनेटरसह आपण गेल्या सहा महिन्यांपासून या विधेयकावर काम करत असल्याचा दावा ग्राहम यांनी केला आहे. युक्रेन शांतता करारासाठी पुढे आलेला असतानाही रशिया लष्करी कारवाई काही केल्या थांबत नसल्यावर ग्राहम यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे ज्या देशांमुळे रशियाला मोठी आर्थिक रसद पोहचत आहे, आता त्यांना दंडित करण्याची वेळ आल्याचे ग्राहम यांनी स्पष्ट केले. हे देश रशियाकडून स्वस्तात इंधन खरेदी करत असले तरी त्याचा रशियाला फायदा होत आहे. त्यामुळे भारत , चीन आणि ब्राझील यां देशांवर अत्याधिक दबाव आणण्याची ही संधी आहे. त्यासाठी हे विधेयक सभागृहासमोर मतदानासाठी मांडण्यात येईल असे ग्राहम यांनी स्पष्ट केले.
रशिया प्रतिबंध अधिनियम 2025 काय आहे?
अमेरिका काँग्रेसच्या अधिकृत साईटनुसार, या विधेयकाचा मथळा रशियावर प्रतिबंध अधिनियम 2025 असा आहे. यामध्ये रशियाला मदत करणाऱ्या संस्था, देश, व्यक्तींना दंडित करण्यात येणार आहे. त्यासाठी व्यापक दंडात्मक उपाय करण्यात येतील. या विधेयकात रशियातून संयुक्त राज्य अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या किंमतीवर किमान 500 टक्के कर आकारण्याचा प्रस्ताव आहे.
पंतप्रधान मोदी सध्या नाराज
तर डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, भारताद्वारे रशिया तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतीय वस्तू्ंवर टॅरिफ लावले आहे. त्यामुळे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नाराज आहेत. हाऊस रिपब्लिकन पार्टीच्या सदस्यांच्या बैठकीत बोलताना ट्रम्प म्हणाले की असं असलं तरी मोदींशी आपले संबंध अजूनही चांगले आहेत. टॅरिफच्या मुद्यावर तणाव सुरु असल्याचे ट्रम्प यांनी मान्य केलं. पंतप्रधान मोदींचे माझ्याशी अत्यंत घनिष्ठ आणि चांगले संबंध आहेत. पण ते भारतावर मोठा टॅरिफ लावल्याने ते माझ्यावर नाराज असल्याचे ट्रम्प म्हणाले. पण जर वाश्गिंटनच्या भूमिकेशी विसंगत भूमिका भारताने घेतली तर टॅरिफ वाढवण्यात येईल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला.