
तुम्ही निवृत्तीच्या उंबरठ्यावर असाल अथवा ईपीएओचे (EPFO) सदस्य असाल तर या नियमांकडे कानाडोळा करू नका. निवृत्तीनंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला, त्याच्या पीएफ खात्यात तीन वर्षांपर्यंत व्याज मिळते. पण त्यानंतर त्याच्या खात्यातील रक्कमेवर व्याज जमा होत नाही. पुढे हे खाते निष्क्रिय होते. तर नोकरी सोडल्यानंतरही पीएफ रक्कमेवर व्याज मिळते. नवीन नोकरी मिळेपर्यंत हे व्याज मिळते असा काहींचा समज आहे. पण तसे नाही. त्यासाठी नियम आहेत. त्यानुसार व्याजाची रक्कम पीएफ खात्याच जमा होते. काय आहेत ईपीएफओचे व्याजासंबंधीचे ते नियम?
निवृत्तीनंतर व्याज
भविष्य कर्मचारी निधी संघटनेच्या (EPFO) नियमांनुसार, तुमच्या PF खात्यावर निवृत्तीनंतर केवळ 3 वर्षांसाठी व्याज मिळते. म्हणजेच, जर एखादा कर्मचारी 58 व्या वर्षी सेवेतून निवृत्त झाला तर तो 61 वर्षांचा होईपर्यंत त्याच्या खात्यात पीएफवरील व्याजाची रक्कम मिळत राहील. त्यानंतर त्याचे पीएफ खाते आपोआप निष्क्रिय होते. त्याच्या रक्कमेवर व्याज देण्यात येत नाही.
इतर ठिकाणी गुंतवणुकीचा पर्याय
अनेकांना वाटते की, निवृत्तीनंतर पीएफ खात्यात पैसे असतील तर सरकार त्याच्यावर व्याज देत राहील. परंतु असे नाही. सरकार निवृत्तीनंतर तीन वर्षांपर्यंत व्याज देते. त्यानंतर व्याज देणे थांबवते. अशावेळी निवृत्तीनंतर तीन वर्षे पीएफ रक्कम फायदेशीर असेल. पण त्यानंतर त्यावर व्याज मिळणार नाही. निवृत्तीच्या तीन वर्षांच्या जवळपास तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम काढणे आणि ती रक्कम इतर चांगल्या ठिकाणी गुंतवणे फायद्याचे ठरेल. कारण त्या रक्कमेवर तुम्हाला इतर ठिकाणी चांगला परतावा मिळेल. पण कोणत्याही स्कॅम अथवा फसव्या योजनेत तुमची इतक्या वर्षांची कमाई मात्र गुंतवू नका.
नोकरी सोडल्यानंतर तीन वर्षे व्याज
जर तुम्ही नोकरी सोडली तर तुमच्या पीएफमधील रक्कमेवर तीन वर्षे व्याज मिळेल. म्हणजे जी तुमची नोकरीची अंतिम कंपनी असेल तिने जी रक्कम जमा केलेली आहे. त्याच रक्कमेवर व्याज मिळेल. तीन वर्षांनंतर तुम्ही नवीन नोकरी स्वीकारली नाही अथवा ही रक्कम काढली नाही तर त्यावर व्याज मिळणार नाही. तुमचे पीएफ खाते निष्क्रिय राहील. तुमची रक्कम तशीच पडून राहील. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफओने 8.25 टक्के व्याजदर निश्चित केलेला आहे. हा व्याजदर नेहमी बदलतो.
पीएफ काढणे सोपे
EPFO ने कर्मचाऱ्यांसाठी PF काढण्याचे नियम सोपे केले आहेत. तुमचा UAN सक्रिय असेल आणि KYC पूर्ण झाले असेल, तर कर्मचाऱ्याला घरबसल्या ऑनलाईन पीएफ काढता येईल. त्यासाठी ईपीएफओच्या अधिकृत साईटवर जा. ऑनलाईन सेवेतंर्गत क्लेम सेक्शनमध्ये जाऊन बँकेच्या तपशीलांची पडताळणी करा. त्यानंतर पीएफ काढण्याची विनंती करा. ओटीपी पडताळणीनंतर पुढील 7-8 दिवसात निधी थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतो.
तर या वर्षाच्या अखेरीस अथवा पुढील वर्षाच्या पहिल्या महिन्यात कर्मचाऱ्याला ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एटीएम कार्ड अथवा युपीआय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याची पीएफ रक्कम काढता येणार आहे.