सोशल मीडिया डाऊन, मार्क झुकरबर्गचे प्रचंड आर्थिक नुकसान, श्रीमंतांच्या यादीतून घसरण

| Updated on: Oct 05, 2021 | 11:34 AM

Facebook Instagram Whatsapp | जागतिक श्रीमंतांच्या यादीतून मार्क झुकरबर्ग एका क्रमांकाने खाली घसरला. सप्टेंबरच्या मध्यापासून फेसबुकच्या शेअर्सची किंमत 15 टक्क्यांनी खाली घसरली आहे. सोमवारी झालेल्या या घसरणीमुळे मार्कची संपत्ती 12,160 कोटी डॉलर्स इतकी झाली आहे. त्यामुळे मार्क झुकरबर्ग बिल गेटस् यांच्यापेक्षा मागे पडला आहे.

सोशल मीडिया डाऊन, मार्क झुकरबर्गचे प्रचंड आर्थिक नुकसान, श्रीमंतांच्या यादीतून घसरण
मार्क झुकरबर्ग
Follow us on

नवी दिल्ली: फेसबुक, इन्स्टाग्राम आणि WhatsApp बंद पडल्यामुळे फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याला मोठा आर्थिक फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. तांत्रिक बिघाडामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि WhatsApp सोमवारी तब्बल सात तास बंद राहिले. त्यामुळे भांडवली बाजारात फेसबुकच्या समभागांची किंमत झपाट्याने खाली आली. फेसबुकचा समभाग जवळपास 4.8 टक्क्यांनी खाली आला. त्यामुळे मार्क झुकरबर्गचे 4,47,34,83,00,000 रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती ‘फोर्ब्स’कडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यामुळे जागतिक श्रीमंतांच्या यादीतून मार्क झुकरबर्ग एका क्रमांकाने खाली घसरला. सप्टेंबरच्या मध्यापासून फेसबुकच्या शेअर्सची किंमत 15 टक्क्यांनी खाली घसरली आहे. सोमवारी झालेल्या या घसरणीमुळे मार्कची संपत्ती 12,160 कोटी डॉलर्स इतकी झाली आहे. सहा तासांमध्ये मार्क झुकरबर्गच्या एकूण संपत्तीत (Net Worth) 52217 कोटींची घट झाली. प्रत्येक तासाला त्याचे 8700 कोटींचे नुकसान झाले.  त्यामुळे मार्क झुकरबर्ग जागतिक धनाढ्यांच्या यादीत बिल गेटस् यांच्यापेक्षा मागे पडला आहे. जागतिक श्रीमंताच्या यादीत आता मार्क झुकरबर्ग पाचव्या स्थानावर आहे.

सात तासांच्या प्रतिक्षेनंतर Whatsapp, इन्स्टाग्राम आणि फेसबुक पूर्ववत

अलीकडच्या काळात जगण्याची ‘मुलभूत’ गरज बनलेल्या सोशल मिडीया व्यासपीठांवरील तांत्रिक बिघाड अखेर तास तासांनी दूर झाला. सोमवारी रात्री साधारण आठ वाजल्यापासून जगभरात Whatsapp, इन्स्टाग्राम आणि फेसबुक हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस डाऊन झाले. त्यामुळे नेटकऱ्यांना इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर कोणतीही पोस्ट शेअर करता येत नव्हती. तसेच अलीकडच्या काळातील संवादाचे प्रमुख माध्यम असलेल्या Whatsapp वरुन एकमेकांना संदेशही पाठवता येत नव्हते. त्यामुळे नेटकऱ्यांच्या मनात चलबिचल सुरु झाली होती. रात्री उशीरापर्यंत अनेकजण सोशल मीडिया कधी पूर्ववत होणार, याची वाट पाहत होते.


अखेर मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास तांत्रिक बिघाड दूर होऊन Whatsapp, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची सेवा पूर्ववत झाली. त्यामुळे जगभरातील नेटकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अनेक कंपन्या आणि संस्थांसाठी त्यांच्या उत्पादनांची जाहिरात आणि प्रसार करण्यासाठी इन्स्टाग्राम आणि फेसबुक या व्यासपीठांचा वापर केला जातो. परंतु, तब्बल सात तास ही दोन्ही व्यासपीठं ठप्प असल्याने अनेकांना त्याचा फटका बसला होता.

फेसबुकचे स्पष्टीकरण

या तांत्रिक बिघाडाच्या पार्श्वभूमीवर फेसबुककडून ट्विटरवर स्पष्टीकरण देण्यात आले होते. आपल्यावर अवलंबून असलेल्या जगभरातील लोकांसाठी आणि व्यवसायांसाठी आम्हाला खेद वाटतो. आम्ही आमची अॅप्स आणि सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आमच्या सर्व सेवा पुन्हा सुरु झाल्या आहेत. आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद, असे फेसबुकने म्हटले होते. तर मार्क झुकरबर्ग यानेही युजर्सकडे जाहीररित्या दिलगिरी व्यक्त केली होती.

हेही वाचा :
whatsapp down | व्हॉट्सअ‌ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम तासाभरापासून डाऊन ! नेमके कारण अस्षष्ट, मेसेज पाठवण्यास नेटकऱ्यांना अडचणी
फेसबुक, इन्स्टा अन् WhatsApp डाऊन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस