
देशभरात वाहनधारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी FASTagसाठी वार्षिक पास लागू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार असून, एकदाच पैसे भरून तब्बल २०० वेळा टोलचा वापर करता येणार आहे. हा पास खासगी कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या वाहनांसाठी लागू केला जाणार आहे.
कसा असेल हा वार्षिक पास?
नवीन FASTag वार्षिक पासची किंमत ३,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा पास एका वर्षासाठी किंवा २०० ट्रिप्सपर्यंत (जे आधी होईल) वैध राहील. १५ ऑगस्ट २०२५ पासून हा नियम देशभरात लागू होणार आहे. यासाठी लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) किंवा रस्ते मंत्रालयाच्या (MoRTH) अधिकृत वेबसाइटवर लिंक उपलब्ध होणार आहे, जिथून नागरिक हा पास खरेदी करू शकतील.
सॅटेलाइट टोल सिस्टमसोबत काम कसे करेल?
लवकरच देशात सॅटेलाइट बेस्ड टोल सिस्टम लागू होणार आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न आहे की, वार्षिक पास त्यात कसा काम करेल? यावर स्पष्टीकरण देताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, सॅटेलाइटद्वारे प्रवासाचा हिशोब घेतला जाईल आणि प्रत्येक प्रवासाची नोंद आपल्या FASTag खात्यात आपोआप जोडली जाईल. जेव्हा २०० ट्रिप्स पूर्ण होतील, तेव्हा हा पास नूतनीकरण (renew) करावा लागेल किंवा पारंपरिक रीचार्जचा पर्यायही निवडता येईल.
नवीन सिस्टीम कधीपासून लागू होणार?
सॅटेलाइट बेस्ड टोलिंग सिस्टम अजून पूर्णपणे लागू झालेली नसली तरी ती लवकरच देशभरात वापरात येईल, असा अंदाज आहे. यामुळे टोल प्लाझांवरील गर्दी कमी होईल आणि वाहनधारकांचा वेळही वाचेल. नवीन प्रणाली अंतर्गत वाहनाची नंबर प्लेट स्कॅन केली जाईल आणि प्रवासाच्या अंतरानुसार थेट खात्यातून शुल्क वसूल होईल. त्यामुळे रोख रकमेचा त्रास किंवा FASTag रिचार्ज विसरण्यामुळे होणाऱ्या अडचणी दूर होतील.
FASTag पास का गरजेचा?
टोल प्लाझावर अनेकदा रिचार्ज नसलेल्या FASTagमुळे रांग लागते आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी वार्षिक पास हे एक उत्तम आणि सोयीचं पर्याय ठरणार आहे. एकदाच भरलेला शुल्क आणि वर्षभर टोलमुक्त प्रवास ही संकल्पना नागरिकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तसेच, लवकरच हा पास घेण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याने, प्रवासी वर्गाने अधिकृत माहितीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे आता टोलच्या रांगेत उभं राहण्याचा त्रास कमी होणार असून, प्रवास अधिक सुलभ आणि जलद होणार आहे.