financial crisis in Sri Lanka : भारताकडून श्रीलंकेला मदत सुरूच, पेट्रोलनंतर आता पुन्हा 40,000 टन डिझेलचा पुरवठा

| Updated on: May 31, 2022 | 6:07 PM

भारताकडून श्रीलंकेला मदत सुरूच आहे. 23 मे रोजी 40 हजार टन पेट्रोल पाठवण्यात आले होते. आता पुन्हा एकदा श्रीलंकेला 40 हजार टन डिझेल पाठवण्यात आले आहे. याशिवाय औषधांचा देखील पुरवठा करण्यात येत आहे.

financial crisis in Sri Lanka : भारताकडून श्रीलंकेला मदत सुरूच, पेट्रोलनंतर आता पुन्हा 40,000 टन डिझेलचा पुरवठा
भारतामधून श्रीलंकेला डिझेलचा पुरवठा
Follow us on

नवी दिल्ली : सध्या श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटातून (financial crisis) जात आहे. या आर्थिक संकटात भारत (India) आपला शेजार धर्म निभावत असून, (India Sri-Lanka relations) श्रीलंकेला भारताकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. भारताकडून आणखी एक 40,000 टन डिझेलची खेप श्रीलंकेमध्ये पाठवण्यात आली आहे. सध्या श्रीलंकेत महागाई सर्वोच्च स्थारावर पोहोचली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर 400 रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहेत. अन्नधान्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. भारताकडून श्रीलंकेला मदत सुरूच असून, गेल्या महिन्यात भारताने इंधनाची आयात करण्यासाठी 50 कोटी डॉलरचं कर्ज देण्याची देखील घोषणा केली होती. या कर्जाचा उपयोग श्रीलंकेला इंधनाची आयात करण्यासाठी होणार आहे. श्रीलंकेकडे असलेले परदेशी चलन मोठ्याप्रमाणात कमी झाल्याने त्यांना दुसऱ्या देशातून विविध वस्तुंची आयात करण्यात अडचणी येत आहेत. यापूर्वी भारताने श्रीलंकेला 23 मे रोजी 40,000 टन पेट्रोलचा पुरवठा केला होता. पेट्रोलपूर्वी हजारो टन डिझेलचा देखील पुरवठा करण्यात आला आहे.

50 कोटी डॉलरचे कर्ज

याबाबत भारतीय उच्चायोगाकडून ट्विट करत माहिती देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारताने श्रीलंकेला मदत म्हणून 40,000 टन डिझेल पाठवले आहे. सोमवारी रात्री ही डिझेलची खेप कोलंबोमध्ये पोहोचली. याशिवाय श्रीलंकेला इंधन खरेदीसाठी 50 कोटी डॉलरचे कर्ज देण्यासंदर्भात फेब्रुवारी 2022 मध्ये करार करण्यात आला आहे. या कर्जातून श्रीलंकेला इंधन खरेदीसाठी मदत होईल. भारताने यापूर्वी श्रीलंकेला 40,000 टन पेट्रोलचा देखील पुरवठा केल्याचे उच्चायोगाच्या वतीने सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा

 

चालू वर्षात 3.5 बिलियन डॉलरची मदत

भारत आपल्या शेजारील देशांवर काही संकट आले तर त्या संकटात त्यांना मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतो. सध्या श्रीलंका आर्थिक संकटात आहे. भारताकडून श्रीलंकेला मदतीचा ओघ सुरू असून, आतापर्यंत भारताने श्रीलंकेला वेगवेगळ्या माध्यमातून तब्बल 3.5 बिलियन डॉलरची मदत केली आहे. मीडियाने केलेल्या दाव्यानुसार श्रीलंकेने भारताकडे 500 मिलियन डॉलर कर्जाच्या क्रेडिट लाईनची मागणी केली आहे. याबाबत श्रीलंकन सरकारची भारत सरकारसोबत चर्चा सुरू आहे.

25 टन औषधांचा पुरवठा

भारताने श्रीलंकेला केवळ पेट्रोल आणि डिझेलचाच पुरवठा केला नाही तर औषधांचा देखील पुरवठा करण्यात आला आहे. भारताने श्रीलंकेला आतापर्यंत जवळपास 25 टन औषधांचा पुरवठा केला आहे. ज्यांची किंमत 260 मिलियन श्रीलंकन रुपयांच्या घरात आहे. देशभरातून श्रीलंकेला मदतीचा ओघ सुरू असून, वेगवेगळ्या संस्था आणि रुग्णालयांच्या मदतीने श्रीलंकेला औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे.