
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर आणि मध्य-पूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग जमा होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून महागाईची भीती वाढली आहे. सोने आणि चांदीच्या किंमतींवर त्याचा सातत्याने परिणाम दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात दोन्ही धातूनी जोरदार मुसंडी मारली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीलाच मौल्यवान धातूत घसरण दिसून आली. त्यामुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. काय आहेत आता किंमती?
सोन्याची किंमत घसरली
गेल्या आठवड्यात सोन्याने 2100 रुपयांहून अधिकची उसळी घेतली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी भाव उतरला. तर आज सकाळच्या सत्रातही किंमतीत घसरण दिसत आहे. सोमवारी 100 रुपयांनी किंमती उतरल्या होत्या. गुडरिटर्न्सनुसार, सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,08,520 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 99,490 रुपये इतका आहे.
चांदीचा उत्साह मावळला
गेल्या आठवड्यात चांदी सुरुवातीला चार दिवस तेजीत होती. 4 सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेच्या सुधारणा जाहीर झाल्या. तेव्हापासून चांदीत कोणती ही वाढ दिसून आली नाही. 5 सप्टेंबर रोजी चांदी एक हजारांनी घसरली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी हजारांनी उतरली. आज सकाळच्या सत्रातही घसरणीचे संकेत दिसत आहेत. एक किलो चांदीचा भाव 1,26,000 रुपयांवर आला आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदीचा भाव वधारला आहे.. 24 कॅरेट सोने 1,08,040 रुपये, 23 कॅरेट 1,07,600, 22 कॅरेट सोने 98,960 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 81,030 रुपये, 14 कॅरेट सोने 63,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,23,368रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोने आणि चांदीवर किती GST
जीएसटी परिषदेची 4 सप्टेंबर रोजी बैठक झाली. त्यात दोन जीएसटी स्लॅबचे धोरण ठरवण्यात आले. आता 5%, 12%, 18%, 28% हे चार टॅक्स स्लॅब नसतील. तर 5% आणि 18% हे दोन स्लॅब असतील. सोने आणि चांदीवर 3% GST आणि मेकिंग चार्ज 5% GST कायम आहे. म्हणजे सरकारने सोने आणि चांदीवर जीएसटी वाढवला नाही.