
विवाह सोहळे, लग्नाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच यंदा देशातील सराफा बाजारात सोन्याने विक्रमी झेप घेतली. सोने आणि चांदीच्या किंमतींनी आकाशाला गवसणी घातली. वाढत्या ट्रेड वॉरमुळे सराफा बाजारात सोन्याच्या किंमती शुक्रवारी 6,250 रुपयांनी उसळल्या. सोने 96,450 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या विक्रमी उच्चांकावर पोहचले. सराफा बाजारात सोने महागल्याने लग्नात वधूच्या दाग दागिने खरेदीचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. अनेक लोक जुने शिक्के, दागदागिने, तुकडे विक्री करून नवीन दाग दागिने खरेदी करत आहेत.
सोन्याच्या दागदागिने विक्रीत घसरण
मुंबई बुलियन असोसिएशनचे सदस्य आणि व्यावसायिक संजय कोठारी यांच्या मते, सोन्याच्या किंमती सध्या उच्चांकावर आहेत. लग्न सोहळ्यांमुळे 80% हून अधिक लोक जुने सोने मोडून नवीन सोने खरेदी करत आहेत. यामुळे त्यांच्या खिशाला जास्त आर्थिक भुर्दंड बसत नाही. त्यांना केवळ मेकिंग चार्ज द्यावा लागतो. अनेक लोक जुने शिक्के, तुकडे आणि दागिने मोडून नवीन सोन्याचे दाग दागिने खरेदी करत आहेत.
जीएसटी आणि घडणावळ : जुन्या दागिन्यांच्या विक्रीवर जीएसटी, बाजार मूल्य कपात आणि मेकिंग चार्ज हे वजा होते. त्यामुळे ग्राहकांना मिळणारी रक्कम कमी होते.
अतिरिक्त शुल्क : तर नवीन दाग दागिने खरेदी करते वेळी, मेकिंग चार्ज हा 10 ते 25 टक्क्यांपर्यंत असतो आणि 3% जीएसटी अदा करावा लागतो.
सोन्याच्या किंमत वाढीचे कारण
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सध्या जागतिक बाजारात सुरू असलेले ट्रेंड वॉर आणि इतर अनेक घटकांचा परिणाम सोन्याच्या वाढत्या किंमतींवर दिसून येत आहे. रशिया-युक्रेन आणि इस्त्रायल-गाझा पट्टीत संघर्ष सुरू आहे. त्यामुळे अनेक गुंतवणुकदारांचा सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीकडे ओढा आहे. अमेरिकेत सत्तांतर झाले. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी टॅरिफ आणल्यानंतर जगात एकच खळबळ उडाली. सध्या या निर्णायाला तीन महिने स्थगिती देण्यात आली आहे. पण यामुळे सोन्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे.
येत्या काळात सोन्याची महागाई
14 एप्रिल 2025 नंतर देशभरात लग्न मुहूर्त सुरू होईल. विवाह सोहळ्यांचा धमाका असेल. त्यामुळे सोन्याच्या दागदागिन्यांची मागणी वाढेल. त्यामुळे या काळात जुन्या दागदागिन्यांची विक्री वाढण्याची आणि नवीन दागदागिने करण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.