सोन्याचा दरवाढीचा विक्रम! आता हौसमौजेला जास्त रक्कम मोजा, 10 ग्रॅमचा भाव काय?

Gold Rate Today : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण आणि कमकुवत डॉलर यांच्यामुळे बुधवारी सोन्याच्या भावाने मोठी उसळी घेतली. सोन्याच्या भावाने नव्या विक्रमाला गवसणी घातली. हौसमोजेसाठी ग्राहकांना आता अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.

सोन्याचा दरवाढीचा विक्रम! आता हौसमौजेला जास्त रक्कम मोजा, 10 ग्रॅमचा भाव काय?
सोन्याचा विक्रम
Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 16, 2025 | 2:27 PM

जर तुम्ही अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करण्याची तयारी करत असाल तर ही बातमी तुम्हाला झटका देऊ शकते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे आणि कमकुवत डॉलरमुळे सोन्याने मोठी मुसंडी मारली. बुधवारी सोन्याच्या भावाने मोठी उसळी घेतली. सोन्याच्या भावाने नव्या विक्रमाला गवसणी घातली. हौसमोजेसाठी ग्राहकांना आता अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना सराफा बाजारातच नाही तर वायदे बाजारातही मोठी झळ सोसावी लागणार आहे.

वायदे बाजारात 1300 रुपयांनी सोने महाग

MCX, वायदे बाजारात सोन्याच्या किंमती 94,573 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या ऐतिहासिक पातळीवर जाऊन पोहचल्या. त्यानंतर किंमत नरमली. गुरुवारी सकाळी जवळपास 9:40 वाजता किंमती 13 टक्के तेजीसह 94,475 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत होत्या. तर सकाळी 11 वाजता किंमती 1300 रुपयांनी महागली.

बुधवारी जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत जोरदार उसळी दिसून आली. डॉलर सातत्याने घसरत असल्याने सोन्याच्या किंमती एकदम उसळल्या. तर जागतिक बाजारात अमेरिकन धोरणामुळे ट्रेड वॉर सुरू आहे. त्याचा हा परिणाम असल्याचा दावा तज्ज्ञ करत आहे. वाढत्या किंमतींमुळे ग्राहक मात्र नाराज झाले आहेत. ऐन लग्नाच्या हंगामात झालेली दरवाढ अनेकांची चिंता वाढवणारी आहे.

कॉमेक्सवर सोने तेजीसह नवीन उच्चांकावर पोहचले आहे. याठिकाणी सोने 2 टक्के वाढीसह 3,294.60 डॉलर प्रति ट्रॉय औसवर व्यापार करत आहे. आर्थिक स्थिरता आणि जागतिक अनिश्चितताच्या भीतीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात अधिक गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी आणि किंमत यामध्ये मोठी वाढ झाली आहे.

सोन्याची किंमत वाढण्याची कारणं काय?

भारत आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी किरकोळ महागाईत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे व्याजदरात अजून कपातीची आशा बळावली आहे. त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतींवर दिसून येत आहे. भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर (CPI) आधारीत किरकोळ महागाई दर मार्च 2025 मध्ये कमी होऊन 3.34 टक्क्यांवर आला आहे. हा दर ऑगस्ट 2019 नंतर सर्वात कमी आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये हा दर 3.61 टक्के इतका होता. गेल्या मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर 4.85 टक्के नोंदवण्यात आला होता.