
नवी दिल्ली, 15 मार्च : अदानी समूह आणि फ्रान्सच्या टोटल एनर्जीझ यांच्या संयुक्त उपक्रम असलेल्या अदानी टोटल गॅस लिमिटेड (ATGL) ने काही औद्योगिक ग्राहकांना पुरवण्यात येणाऱ्या अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही किंमत प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटर (SCM) 119.90 रुपयांवरून 82.95 रुपये इतकी करण्यात आली आहे. किमतीतील हा बदल 16 मार्च रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले असताना अपस्ट्रीम गॅसच्या किमती कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पश्चिम आशियातील युद्धामुळे हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक थांबल्याने भारताच्या एलएनजी पुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यानंतर ATGL ने व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना गॅस वापर 40 टक्क्यांपर्यंत कमी करण्यास सांगितले होते. या मर्यादेपेक्षा जास्त वापरावर स्पॉट मार्केट दर लागू केले जात होते. मात्र आता हे दर कमी करण्यात आले आहेत. अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीने सांगितले की, अपस्ट्रीम किमती कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी आणि सध्याच्या पुरवठा अडचणींच्या परिस्थितीत प्रणालीची स्थिरता व गॅसचे समतोल वितरण राखण्यासाठी ही किंमत कपात करण्यात आली आहे. यामुळे या कंपनीच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कंपनीने ग्राहकांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘3 मार्च 2026 रोजी दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त गॅसची किंमत 119.90 रुपये प्रति SCM वरून 82.95 रुपये प्रति SCM करण्यात आली आहे आणि ती 16 मार्च 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होईल. कंपनीने असेही स्पष्ट केले की, ‘गॅस पुरवठ्यातील अडथळ्यांच्या परिस्थितीत प्रणालीचे व्यवस्थापन आणि गॅसचे समतोल वितरण कायम ठेवत अपस्ट्रीम किमतीतील घट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही सुधारणा करण्यात आली आहे.
अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीने असेही म्हटले आहे की, अतिरिक्त गॅसबाबत आधी जाहीर केलेल्या इतर अटींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. विद्यमान आदेशानुसार औद्योगिक ग्राहकांना 80 टक्के गॅस पुरवठ्याबाबत स्पष्टीकरण मिळवण्यासाठी GAIL (India) Ltd कडे चौकशी करावी. यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातीला ATGL ने सीएनजी आणि घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाइप्ड कुकिंग गॅस (PNG) च्या किमती वाढवल्या नव्हत्या, मात्र पश्चिम आशियातील संकटामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याने काही मोठ्या औद्योगिक ग्राहकांवर पुरवठा मर्यादा लावण्यात आल्या होत्या.
पश्चिम आशियातील संकटामुळे भारताच्या गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्यानंतर सरकारने गॅस वाटपाची रचना बदलून सीएनजी आणि घरगुती गॅसला प्राधान्य दिले, तसेच आयातीत एलएनजीच्या किमतींचे एकत्रित दर ठरवले. या प्रक्रियेमुळे निर्माण झालेल्या कमी किमतींचा फायदा आता ग्राहकांना दिला जात आहे. कंपनीने शेवटी म्हटले की, पुरवठ्यातील अडचणींचे व्यवस्थापन करताना सर्व विभागांतील ग्राहकांचे हित जपून गॅसचा अखंडित पुरवठा सुरू ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. (पीटीआय)