
गावात राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत केवळ शहरांपुरताच मर्यादित असलेल्या बिझनेस संधी आता सरकारच्या विविध योजनांमुळे थेट ग्रामीण भागात पोहोचल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकार केवळ कर्ज उपलब्ध करून देत नाही, तर व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली ट्रेनिंग आणि काही योजनांत थेट सबसिडी देखील देत आहे.
गावाकडील लघुउद्योगांना चालना देण्यासाठी प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम (PMEGP) ही योजना अतिशय फायदेशीर ठरते. या योजनेच्या माध्यमातून टेलरिंग युनिट, मसाला प्रक्रिया केंद्र, फर्निचर वर्कशॉप अशा विविध उद्योगांसाठी सरकारकडून थेट २५% ते ३५% पर्यंत सबसिडी दिली जाते. कमी गुंतवणुकीत उद्योग सुरू करण्याचा विचार असणाऱ्यांसाठी ही योजना एक उत्तम संधी आहे.
तुमच्याकडे जर एखादा नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पना असेल, जसे की ऑर्गेनिक शेती, ऑनलाईन विक्री किंवा फार्म टेक्नोलॉजीसंबंधी एखादा नवा उपक्रम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत तुम्हाला कर सवलत, सरकारी प्रशिक्षण आणि गुंतवणूक संधी मिळू शकते. स्टार्टअप्ससाठी सरकारच्या या योजनेचा ग्रामीण भागातही मोठा फायदा होत आहे.
शेतीपूरक व्यवसाय करायचा विचार करणाऱ्या शेतकरी आणि तरुणांसाठी राष्ट्रीय पशुधन मिशन हा एक मजबूत आधार ठरतो आहे. या योजनेच्या अंतर्गत डेअरी फार्मिंग, बकरीपालन आणि कुक्कुटपालन यासाठी विशेष कर्ज आणि सबसिडी दिली जाते, ज्यामुळे कमी भांडवलात व्यवसायाची सुरुवात करणे सहज शक्य होते.
लघु व्यवसायासाठी थेट आर्थिक मदतीची गरज भासल्यास प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) हा उत्तम पर्याय आहे. या योजनेअंतर्गत किराणा दुकान, सायकल रिपेअरिंग सेंटर, कपड्यांचं दुकान किंवा एखादं लघु मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्यासाठी कोणतीही गॅरंटी न घेता थेट १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होते, जे ग्रामीण भागातील अनेकांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत करत आहे.
गावात स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचं स्वप्न आता लांबचं राहिलेलं नाही, कारण केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून हे स्वप्न साकार करण्याची मोठी संधी समोर आली आहे. या योजनांची सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा जवळच्या जिल्हा उद्योग केंद्र अथवा बँकेत संपर्क साधून सल्ला घेऊ शकता. योग्य मार्गदर्शन घेतल्यास ग्रामीण भागातही यशस्वी व्यवसाय उभारणे शक्य आहे.