
SIP Investement : प्रत्येकालाच आपल्याजवळ असलेल्या पैशांचे मूल्य वाढावे असे वाटते. याच कारणामुळे अनेकजण बचत केलेले पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतात. काही लोक पैसे मुदत ठेवीत टाकतात. तर काही लोक हेच पैसे शेअर बाजारात गुंतवतात. मात्र अनेकांना म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी करणेही सोईस्कर वाटते. विशेषत: नोकरदार प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम एसआयपीत गुंतवतात. दरम्यान, हीच एसआयपी करताना काही बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. एसआयपी करताना हे नियम पाळले तर तुम्ही गुंतवलेल्या पैशांचे मूल्य आणखी वाढू शकते.
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते दीर्घ काळासाठी एसआयपी केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते. तुम्ही एखादी एसआयपी करत असाल तर त्यातून तुम्हाला साधारणत: 12 ते 15 टक्क्यांनी रिटर्न्स मिळू शकतात, असे सांगितले जाते. असे असले तरी बाजाराच्या स्थितीवरून तुम्हाला किती परतावा मिळणार हे ठरते. मात्र एसआयपी करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक केल्यास तुम्हाला हवा तेवढा किंवा समाधानकारक परतावा मिळू शकत नाही.
तुम्ही जेवढ्या लवकर एसआयपी सुरू कराल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होण्याची शक्यता वाढते. नोकरदारांनी पगार कधी होतो, ही बाब लक्षात घेऊनच एसआयपीची तारीख निश्चित करावी, असा सल्ला दिला जातो. एसआयपीतून तुम्हाला जास्त परतावा हवा असेल तर ती दीर्घकाळासाठी करायला हवी. तुम्हाला कमी जोखीम घेऊन एसआयपी करायची असेल तर त्यासाठी तुम्ही लार्ज कॅफ फंडाची निवड करू शकता. त्यामुळेच एसआयपी करताना या बाबींची काळजी घेतली तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता वाढते.
दरम्यान, शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्यापेक्षा एसआयपी हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जात असला तरी त्यातही काही जोखीम असतेच. बाजाराच्या स्थितीवरून तुम्ही गुंतवलेल्या पैशांचे मूल्य कमी-जास्त होऊ शकते. त्यामुळे योग्य तो अभ्यास करून तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यायला हवा.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)