
पगारवाढ म्हटलं की नोकरदार वर्गाच्या आनंदाला सीमा राहत नाही. बऱ्याच कंपन्या वर्षातून एकदा पगारवाढ करत असतात. मात्र काही कंपन्या खुप कमी पगारवाढ करतात. अशातच आता एका खासगी कंपनीने 31 हजार रुपयांची पगारवाढ करण्याची घोषणा केली आहे. ह्युंदाई मोटर इंडिया असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी तीन वर्षांत आपल्या कर्मचाऱ्यांना 31 हजारांची पगारवाढ देणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ह्युंदाई मोटर ही एक दक्षिण कोरियन ऑटोमोबाईल कंपनी आहे. ही कंपन्या विविध प्रकारची वाहने तयार करते. या कंपनीने 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2027 या कालावधीसाठी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 31 हजारांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती देताना म्हटले की, हा वेतन करार कंपनी आणि मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना, युनायटेड युनियन ऑफ ह्युंदाई एम्प्लॉईज (UUHE) यांच्यात झाला आहे. याअंतर्गत टेक्निकल आणि कामगार श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार आहे.
ह्युंदाई कंपनीने या पगारवाढीबाबत बोलताना सांगितले की, 31 हजार रुपयांची ही पगारवाढ तीन वर्षांत वितरित केली जाईल. ही पगारवाढ पहिल्या वर्षी 55%, दुसऱ्या वर्षी 25% आणि तिसऱ्या वर्षी 20% असेल. ह्युंदाई मोटर इंडियाचे पीपल स्ट्रॅटेजी प्रमुख यंगम्युंग पार्क यांनी सांगितले की, ‘परस्पर विश्वास, आदर आणि सकारात्मक संवादानंतर हा करार झाला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक विकासाला प्राधान्य मिळत आहे.’
ह्युंदाई मोटर्सने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट 2025 पर्यंत काम करणाऱ्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 90% कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होईल. याचाच अर्थ कंपनीच्या 1981 कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, मारुतीनंतर ह्युंदाईकडे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे उत्पादन युनिट आहे. कंपनीने तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे एक कारखाना बांधला आहे, यात दरवर्षी 598,666 युनिट तयार होतात. यानंतर टाटा आणि महिंद्रा या कंपन्यांचा नंबर लागतो.