
Bank Cash Deposit Limit : जर तुम्हालाही बँकेत मोठमोठ्या रक्कमा जमा करण्याची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बँकेत पैसे ठेवणे हे तसं सुरक्षित मानल्या जाते. कारण घरात मोठी रक्कम ठेवणे धोक्याचे ठरू शकते. पण एका आर्थिक वर्षात मर्यादेपक्षा जास्त पैसा जमा केला तर तुमचे असे व्यवहार आयकर खात्याच्या रडारवर येतील. कारण मोठ्या रक्कमांच्या व्यवहारांची माहिती आयकर खात्याला देणे बँका आणि सहकारी बँकांना द्यावी लागते. तुम्ही असे व्यवहार लपवण्याचा प्रयत्न करू शकत नाही.
या निर्णयामुळे वाढली धडधड
नुकताच एका प्रकरणात दिल्लीतील आयकर खात्याच्या न्यायाधिकरणाने (ITAT) निकाल दिला. जर एखाद्या व्यक्तीच्या खात्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा होत असेल तर आयकर खात्याला त्याच्या उत्पन्नाचा स्त्रोत जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे या निकालात स्पष्ट करण्यात आले. आता या निकालामुळे मोठ्या प्रमाणावर बँकेत रक्कम जमा करणाऱ्यांची चिंता वाढली आहे.
मोठी रक्कम जमा केल्यावर का येते आयकर खात्याची नोटीस?
मोठी रक्कम तुमच्याच खात्यात जमा करणे हा काही अपराध नाही. पण जर त्याचा स्त्रोत अस्पष्ट असेल तर मग धोका वाढतो. अघोषित उत्पन्न (Unaccounted Money) म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. आयकर खात्याची विविध बँकातील मोठ्या उलाढालीवर लक्ष असते. कर चोरी अथवा काळेधनाचे हे संकेत मानल्या जातात. जर एखाद्या व्यक्तीने एक अथवा एकापेक्षा अधिक खात्यात एकूण 10 लाख अथवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केली असेल. तर बँक त्याची माहिती नियमीतपणे आयकर खात्याला देते. त्यानंतर जर गरज वाटली तर आयकर विभाग त्याची माहिती घेण्यासाठी व्यक्तीची चौकशी करू शकते. त्यासाठी नोटीस पाठवू शकते.
नोटीस आल्यावर काय कराल?
अशा प्रकरणात जर उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध असेल आणि नोटीस आली तर चिंतेचे कारण नाही. सर्वात अगोदर ही नोटीस आयकर विभागाने का पाठवली हे तपासा. हे प्रकरण जर मोठ्या रोख रक्कमेबाबत असेल तर मग तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागेल. म्हणजे तुम्ही एखादी मालमत्ता विक्री केली असेल अथवा व्यवसायातून ही रक्कम मिळाली असेल. गुंतवणुकीचा परतावा असेल. ही रक्कम नातेवाईकाने दिली असेल तर त्याची पावती, बँक विवरण पत्र अथवा इतर संबंधित पुरावे दाखवावे लागतील. त्यामुळे तुम्ही कोणत्याही कायदेशीर अडचणीत अडकणार नाहीत.
नोटीस येऊ नये म्हणून हे उपाय करा
रोख रक्कम मर्यादेचे भान ठेवा. शक्यतोवर तुमच्या सर्व बँक खात्यात एकूण जमा रक्कम 10 लाख रुपयांपेक्षा कमी असेल याची व्यवहार करताना काळजी घ्या.
मोठ्या रक्कमा जमा करताना व्यवहार पारदर्शक ठेवा, उपलब्ध स्त्रोताची कागदपत्रा जपून ठेवा
जास्तीत जास्त डिजिटल पद्धतीचा वापर करा. ऑनलाईन वा बँक ट्रान्सफरचा पर्याय अवलंबा. म्हणजे त्याचे डिजिटल पुरावे तुमच्याकडे राहतील.
आयकर खात्याची नोटीस आल्यावर उपलब्ध कागदपत्रांसह त्याला लागलीच उत्तर द्या.
आयकर रिटर्नमध्ये या सर्व व्यवहारांची व्यवस्थित माहिती द्या.