इराण-इस्रायल युद्धादरम्यान मोठी उलटापालट, भारताने असा बदलला संपूर्ण खेळ

भारताचा परकीय चलन साठा चांगलाच वाढला आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारताच्या परकीय चलन साठा १३ जून रोजी संपलेल्या आठवड्यात २.२९ अब्ज डॉलर म्हणजेच २० हजार कोटी रुपयांनी वाढला आहे.

इराण-इस्रायल युद्धादरम्यान मोठी उलटापालट, भारताने असा बदलला संपूर्ण खेळ
भारताचा परकीय चलन साठा वाढला.
Image Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: Jun 22, 2025 | 7:10 AM

मागील आठवडा भारतासाठीच नाही तर जगासाठी महत्वाचा होता. इराण-इस्त्रायल युद्धामुळे जगभरातील शेअर बाजारात अनिश्चितता होती. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. भारतालाही काही आघाड्यांवर मोठे नुकसान होण्याची भीती होती. परंतु या वातावरणात भारताने सर्व परिस्थिती बदलली आहे. भारताच्या परकीय चलन साठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. भारताचा परकीय चलन साठा सलग दुसऱ्या आठवड्यात वाढला आहे. देशाच्या तिजोरीत २ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे २० हजार कोटी रुपये जमा झाले आहेत.

भारताचा परकीय चलन साठा आठ महिन्यांतील उच्चांकावर पोहचला आहे. मागील उच्चांक मोडण्यासाठी भारताला अजून ६ अब्ज डॉलर्सची गरज आहे. देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग पहिल्यास पुढील महिन्याभरात हा उच्चांक मोडला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या पराकीय चलनसाठ्यात थोडी वाढ झाली आहे.

भारताचा परकीय चलन साठा किती

भारताचा परकीय चलन साठा सलग दुसऱ्या आठवड्यात चांगलाच वाढला आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारताच्या परकीय चलन साठा १३ जून रोजी संपलेल्या आठवड्यात २.२९ अब्ज डॉलर म्हणजेच २० हजार कोटी रुपयांनी वाढला आहे. त्यानंतर देशाचा परकीय चलन साठा ६९८.९५ अब्ज डॉलरवर गेला आहे. सप्टेंबर २०२४ नंतर हा सर्वाधिक चलनसाठा आहे. म्हणजेच गेल्या आठ महिन्यांत देशात परकीय चलनचा उच्चांक झाला आहे. तसेच भारताचा सोन्याचा साठाही वाढला आहे.  यामध्ये ४२.८ कोटी डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यानंतर देशाचा सोन्याचा साठा ८६.३२ अब्ज डॉलर्स झाला आहे.

पाकिस्तानची काय आहे परिस्थिती?

चीनी मीडिया सिन्हुआनुसार, १३ जून रोजी पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेत परकीय चलनाचा साठा ४६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची वाढ झाली आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने जारी केलेल्या निवेदनानुसार, एसबीपीचा साठा एका आठवड्यापूर्वीच्या ११.६८ अब्ज डॉलर्सवरून ११.७२ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. १३ जूनपर्यंत पाकिस्तानची परकीय गंगाजळी जवळपास १७ अब्ज डॉलर्सवर गेली आहे.