LPG गॅस सिलेंडर बुकिंगच्या नावाखाली सायबर फसवणूक! एका चुकीच्या क्लिकमुळे होतु शकते बँक अकाउंट रिकामे!
LPG Cylinder Booking Scam: सायबर गुन्हेगारांनी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी गॅस सिलेंडर बुकिंग आणि गॅस सबसिडीचा आधार घेतला आहे.

तुमच्या घरीही LPG गॅस सिलेंडर वापरला जात असेल, तर ऑनलाइन बुकिंग आणि सबसिडीशी संबंधित व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. कारण, आता सायबर गुन्हेगारांनी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी गॅस सिलेंडर बुकिंग आणि गॅस सबसिडीचा आधार घेतला आहे. KYC अपडेट करण्याच्या नावाखाली किंवा गॅस सबसिडी बंद होण्याची भीती दाखवून ग्राहकांना बनावट मेसेज आणि लिंक पाठवल्या जात आहेत. यासंदर्भात ICICI बँकेनेही आपल्या ग्राहकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
नेमकी कशी केली जाते फसवणूक?
सायबर भामटे सर्वप्रथम ग्राहकांना फोन करून आपण गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे सांगतात. तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही किंवा लवकर अपडेट न केल्यास गॅस सबसिडी बंद होईल, असे सांगून ग्राहकांमध्ये भीती निर्माण केली जाते. त्यानंतर WhatsApp किंवा SMS द्वारे एक लिंक पाठवली जाते. या लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरण्यास सांगितले जाते.
काही वेळा ग्राहकांना KYC अपडेट करण्यासाठी किंवा सबसिडी पुन्हा सुरू करण्यासाठी APK फाइल डाउनलोड करण्यास सांगितले जाते. मात्र, ही फाइल मोबाईलमध्ये मालवेअर इन्स्टॉल करू शकते. त्यामुळे फोनमधील वैयक्तिक माहिती, बँकिंग तपशील आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित डेटा सायबर गुन्हेगारांच्या हाती लागू शकतो. परिणामी, तुमच्या बँक खात्यातील पैसेही धोक्यात येऊ शकतात.
फसवणूक टाळण्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा
गॅस सबसिडी किंवा KYC अपडेटच्या नावाने आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
कोणत्याही व्यक्तीसोबत OTP, ATM PIN किंवा CVV शेअर करू नका.
WhatsApp किंवा SMS वर आलेल्या अनोळखी APK फाइल डाउनलोड करू नका.
गॅस बुकिंग आणि KYC साठी केवळ अधिकृत अॅप किंवा वेबसाइटचाच वापर करा.
गॅस एजन्सी किंवा बँकेचा कर्मचारी असल्याचा दावा करणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका.
ऑनलाइन फसवणूक झाल्यास काय करावे?
चुकून सायबर फसवणुकीला बळी पडल्यास घाबरून न जाता त्वरित कारवाई करा. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच 1930 या राष्ट्रीय सायबर क्राइम हेल्पलाइनवर संपर्क साधा. तसेच cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवा.
लक्षात ठेवा, गॅस सबसिडी किंवा KYC अपडेटच्या नावाने येणारा प्रत्येक मेसेज खरा असेलच असे नाही. त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिची खात्री करा. थोडीशी सावधगिरी तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकते.