९० तास काम करण्याचा सल्ला देणारे सुब्रमण्यम यांच्या पॅकेजमध्ये ५० टक्के वाढ, आता वार्षिक पगार ७६.२५ कोटी रुपयांवर

सुब्रह्मण्यम काही महिन्यांपूर्वी चर्चेत आले होते. त्यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ९० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. तसेच कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करावे, असे म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर ते ट्रोल झाले होते.

९० तास काम करण्याचा सल्ला देणारे सुब्रमण्यम यांच्या पॅकेजमध्ये ५० टक्के वाढ, आता वार्षिक पगार ७६.२५ कोटी रुपयांवर
| Updated on: Jul 18, 2025 | 9:42 AM

Larsen & Toubro Limited: आठवड्यातून ९० तास काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर ट्रोल झालेले लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस एन सुब्रह्मण्यम यांच्या पगारात घशघशीत वाढ झाली आहे. त्यांचे पॅकेज २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५०% वाढले आहे. सुब्रमण्यम यांना आर्थिक २०२५ मध्ये एकूण ७६.२५ कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले. मागील वर्षी त्यांचे पॅकेज ५१.०५ कोटी रुपये होते. पॅकेजमधील ही वाढ कर्मचारी स्टॉक ऑप्शन्सच्या (ईएसओपी) वापरामुळे झाली आहे. त्याचे मूल्य १५.८८ कोटी रुपये होते. गेल्या वर्षी त्यांनी कोणताही ईएसओपी घेतला नव्हता.

इतर अधिकाऱ्यांचे पगार वाढले

स्टॉक ऑप्शन एक कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यात विशिष्ट तारखेला शेअर खरेदी किंवा विकण्याची सुविधा मिळते. पॅकेज वाढलेल्या यादीमध्ये कंपनीच्या काही इतर उच्च अधिकाऱ्यांच्या पगार पॅकेजची माहिती देखील दिली आहे. पूर्णवेळ संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी आर शंकर रमण यांना आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ३७.३३ कोटी रुपये मिळाले. उपव्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष सुब्रमण्यम शर्मा यांना ४४.५५ कोटी रुपये मिळाले. वरिष्ठ व्यवस्थापक स्तरावरील अधिकाऱ्यांचा पगार कंपनीच्या मजबूत कामगिरीच्या निकषानुसार ठरतात.

सुब्रह्मण्यम यामुळे आले चर्चेत

एल अँड टीचे अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यम काही महिन्यांपूर्वी चर्चेत आले होते. त्यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ९० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. तसेच कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करावे, असे म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर ते ट्रोल झाले होते. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर कंपनीला स्पष्टीकरण द्यावे लागले होते. सुब्रमण्यम यांचा वक्तव्याचा अर्थ चांगली कामगिरी करण्यासाठी मोठे प्रयत्न करण्याची गरज आहे, असा आहे. त्यांचा हेतू कर्मचाऱ्यांवर अधिक काम करण्यासाठी दबाव आणणे नाही, असे कंपनीने स्पष्टीकरण दिले होते.

एल अँड टी ही पायाभूत क्षेत्रात काम करणारी देशातील एक मोठी कंपनी आहे. अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा बांधकाम करण्याचे काम ही कंपनी करते. एस एन सुब्रह्मण्यम हे या कंपनीचे अध्यक्ष आहेत.