मध्यरात्रीच मोठा खेळ… रातोरात निर्णय… तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे भाव काय?
महाराष्ट्रात मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ₹3 ची मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने आणि निवडणुकीनंतर ही दरवाढ झाल्याने नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे, अमरावतीसह राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये नवे दर लागू झाले आहेत. तुमच्या जिल्ह्यातील आजचे इंधन दर येथे जाणून घ्या.

देशात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. आज सकाळी सकाळीच राज्यातील जनतेला महागाईची फोडणी बसल्याची बातमी मिळाली. राज्यात भाजीपाल्याचे दर वाढल्याची बातमी आली असतानाच पेट्रोल आणि डिझेलचे दर 3 रुपयांनी महागल्याची बातमी येऊन धडकली. आधीच पेट्रोल आणि डिझेल मिळण्याची मारामार असतानाच इंधनाचे दर वाढल्याची बातमी आल्याने नागरिकांमध्ये चांगलीच नाराजी पसरली. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. राज्यात वेगवेगळ्या भागात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. तुमच्या जिल्ह्यात काय दर आहे हे घ्या जाणून…
ठाण्यात सीएनजी नंतर पेट्रोल डिझेलचे दर तीन रुपयाने वाढले आहेत. आजचे पेट्रोलचे दर 106 रुपये 73 पैसे तर डिझेलचे दर 93.23 पैसे दर दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इलेक्ट्रिक गाड्या देखील महाग असल्यामुळे घेतलेल्या गाड्याचे काय करायचे? असा सवाल करतानाच सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करावी, अशी देखील मागणी यावेळेस वाहन चालकांनी केली आहे.
मुंबईत पेट्रोल 106.68 रुपये प्रति लिटर
मुंबईतील नवीन दरांनुसार पेट्रोल 106.68 रुपये प्रति लिटर झाले असून त्यात 3.14 रुपयांची वाढ झाली आहे. तर डिझेलचा दर 93.14 रुपये प्रति लिटर झाला असून त्यात 3.1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव हे प्रमुख कारण मानले जात आहे. इराण युद्ध आणि पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल 126 डॉलरपर्यंत पोहोचल्याने तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढला होता. भारत आपल्या एकूण तेल गरजेपैकी सुमारे 90 टक्के तेल आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारातील चढ-उतारांचा थेट परिणाम देशांतर्गत इंधन दरांवर होत आहे.
दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर ही दरवाढ लागू करण्यात आल्याची चर्चा आहे. सरकारी तेल कंपन्यांना दररोज सुमारे 1,000 ते 1200 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याने ही वाढ अपरिहार्य असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी मार्च 2024 मध्ये केंद्र सरकारने अबकारी शुल्कात कपात करून इंधन दर कमी केले होते.
अमरावतीत 108 रुपये 24 पैसे
अमरावतीत पेट्रोलचे दर 108 रुपये 24 पैसे प्रति लिटर तर डिझेल 94 रुपये 74 पैसे आहे. मध्यरात्रीपासून अमरावतीमध्ये पेट्रोलच्या किमतीमध्ये प्रतिलिटर 3 रुपये 13 पैशांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी अमरावतीमध्ये पेट्रोलचे दर होते. 104 रुपये 11 पैसे तर डिझेल 91 रुपये 63 पैसे.
सायकल वापरू
सोलापुरातही 3 रुपयांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत. पेट्रोल दर वाढल्यानंतर सोलापूरकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. पेट्रोलचे दर वाढवल्याने आमच्या खिशाला झळ पोहचते. आम्हाला कमी पेट्रोल वापरण्यास सांगत असले तरी त्यांनी स्वतः देखील त्याचे पालन करावे. पेट्रोल वाढले असले तरी आम्ही गाडी ऐवजी सायकल वापरू. पंतप्रधानांनी सांगितले म्हणून मी सायकल वापरायला तयार आहे, असं एका ग्राहकाने म्हटलं आहे.
नाशिकमध्ये पेट्रोल 107.93 रुपये
नाशिक शहरातही मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. नाशिकमध्ये आज पेट्रोल 107.93 तर डिझेल 94.41 रुपये लिटर विकले जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दर वाढले
छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये मध्यरात्रीपासून पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. पंपावर सध्याचे पेट्रोलचे दर 108.56 पैसे एवढे आहेत या अगोदर 105.42 पैसे एवढे होते म्हणजेच 3 रुपये 14 पैशांनी हे दर वाढले. पेट्रोल तीन रुपये 14 पैशाने तर डिझेल तीन रुपये 11 पैशांनी वाढले त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसलेले चित्र आहे.
पेट्रोलचे दर
पहिले दर: 105.17 पैसे
आताचे दर: 108.31 पैसे
वाढलेले दर: 3.14 पैसे
डिझेल दर
पहिले दर: 91.67 पैसे
आताचे दर: 94.78 पैसे
वाढलेले दर: 3.11 पैसे
रत्नागिरीतही वाढ
रत्नागिरी जिल्ह्यात देखील पेट्रोल तीन रुपयांनी महागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पेट्रोलचा दर 108.63 पैसे इतका आहे. तर डिझेलच्या दरात तीन रुपये 11 पैशांनी वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या डिझेलचे दर 95.12 रुपये झाले आहेत.
कालचे दर
1 ) पेट्रोल – 105. 49 पैसे
2 ) डिझेल – 92.12 पैसे
आजचे दर
1 ) पेट्रोल – 108.63 पैसे
2 ) डिझेल – 95.12 पैसे
वसई विरारमध्ये एका रात्रीत 3 रुपये 11 पैशाने वाढ
वसई विरारकरांसाठी अतिशय।महत्त्वाची बातमी असून, डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या महागाई ने वाहनधारकांचे कंबरडे मोडणार आहे. आज एका रात्रीत 3 रुपये 11 पैशाने डिझेलमध्ये तर 2 रुपये 51 पैशाने पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. काल डिझेलचा दर 90 रुपये 57 पैसे होता तर आज तोच दर आज 93 रुपये 68 पैसे झाला आहे. तर पेट्रोल काल 104 रुपये 7 पैसे होते तर आज 107 रुपये 21 पैसे झाले आहे.
नागपुरात पेट्रोल 107.18 पैसे प्रति लिटर
नागपूरात पेट्रोल 3 रुपये 16 पैसे प्रति लिटर महागलं आहे. नागपुरात सध्या पेट्रोलचे दर 107.18 पैसे प्रति लिटर आहे. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपये 11 पैसे वाढ झाल्याने सध्या डिझेलचे दर 93.69 रुपये लिटर झाले आहे. इधंन दरवाढीचं खापर काही लोक जगातील परिस्थितीवर फोडत आहेत, तर काही लोक आता आम्ही सायकल खरेदी करु, निवडणुका झाल्यावर दरवाढ केली, अशा भावना व्यक्त करत आहेत.
कोल्हापुरात नाराजी
पेट्रोल आणि डिझेलचे दर अचानक वाढल्यामुळे कोल्हापुरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इंधनाच्या दरावरच महागाई अवलंबून असते. आधीच महागाईचा भडका उडाला असताना पुन्हा डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना फटका बसणार आहे. त्यामुळे सरकारने हे दर तातडीने कमी करावे, अशी मागणी कोल्हापुरातील नागरिकांनी केली आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रतिलिर 104 रुपये 49 पैसे इतका होता तो आता प्रतिलीटर 107 रुपये 63 पैसे इतका झाला आहे. तर डिझेल प्रतिलीटर 91 रुपये 04 पैसे इतके होते, ते आता प्रतिलीटर 94 रुपये 24 पैसे इतके झाले आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे घराचं बजेट कोलमडणार असल्याच्या प्रतिक्रिया कोल्हापूरकरांनी व्यक्त केल्या आहेत.
>> पेट्रोलचे दर (प्रति लिटर, रुपये)
ठाणे – 106.73
मुंबई – 106.68
अमरावती – 108.24
नाशिक – 107.93
रत्नागिरी – 108.63
वसई-विरार – 107.21
नागपूर – 107.18
कोल्हापूर – 107.63
छत्रपती संभाजी नगर – 108.31
>> डिझेलचे दर (प्रति लिटर, रुपये)
ठाणे – 93.23
मुंबई – 93.14
अमरावती – 94.74
नाशिक – 94.41
रत्नागिरी – 95.12
वसई-विरार – 93.68
नागपूर – 93.69
कोल्हापूर – 94.24
छत्रपती संभाजी नगर – 94.78