Middle Class Trap : या जाळ्यात अडकून मध्यमवर्ग बरबाद, तुम्ही पण अडकलात का?

Property in Mumbai or Bengaluru: मुंबई आणि बेंगळुरू सारख्या मोठ्या शहरात घर खरेदी करणे ही काही सोप्पी गोष्टी राहिली नाही. या घराच्या स्वप्नामागे धावताना मध्यमवर्गाची दमछाक झाली आहे. त्याविषयी अर्थतज्ज्ञांनी मोठा इशारा दिला आहे.

Middle Class Trap : या जाळ्यात अडकून मध्यमवर्ग बरबाद, तुम्ही पण अडकलात का?
मध्यमवर्गावर कर्जाचा डोंगर
| Updated on: Nov 07, 2025 | 4:04 PM

Middle Class Home Loan : मुंबई आणि बेंगळुरू सारख्या बड्या शहरांमध्ये घर खरेदी करण्याचे स्वप्न महागले आहे. या घराच्या स्वप्नामागे धावताना सर्वसामान्यांची दमछाक झाली आहे. येथील मालमत्ता अत्यंत महाग झाल्या आहेत. त्या खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होत आहे. या महागड्या मालमत्ता खरेदी करणे आणि कर्ज काढणे, हप्ते चुकते करणे यातच त्यांचे आयुष्य रगडले जात आहेत. अर्थतज्ज्ञ सुजय यू (Sujay U) यांनी याविषयीचा इशारा दिला आहे.

इकडं आड, तिकडं विहीर

अर्थतज्ज्ञ सुजय यू यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट केली आहे. मोठ्या शहरांमध्ये घरं खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. घर हे संपत्ती कमावण्याचा मार्ग नसल्याचा दावा यू यांनी केला आहे. त्यांच्या मते, शहरी भागात भारतीयांना घर खरेदी करण्यापेक्षा भाड्याने राहणे अधिक फायदेशीर आहे. मालमत्ता खरेदी करण्याचा अर्थ श्रीमंत होणे ही धारणा मोडीत निघाल्याचा दावा सुजय यू यांनी केला.

कमाईच्या तुलनेत मालमत्ता महाग

सुजय यू यांच्या मते, मुंबईत आज 2 BHK फ्लॅटची किंमत 2 ते 2.2 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. तर बेंगळुरुमध्ये ही किंमत 1.2 ते 1.4 कोटी रुपयांच्या आसपास आहे. इतर या शहरांमध्ये एका कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न केवळ 20 ते 30 लाख रुपये इतका आहे. त्यामुळे घराची किंमत कुटुंबाच्या उत्पन्नाच्या 8 ते 12 पट अधिक आहे.

ईएमआयच्या जाळ्यात सर्वसामान्य

सुजयने या पोस्टमध्ये गृहकर्जाच्या ईएमआयसंदर्भात त्याची मतं व्यक्त केली आहेत. त्याने गृहकर्जाचा हप्ता हा एक सापळा असल्याचा दावा केला आहे. त्याच्यामध्ये बहुसंख्य मध्यमवर्गीय या ट्रॅपमध्ये अडकले आहेत. त्याच्या दाव्यानुसार, मुंबईतील 2 कोटी रुपयांच्या सदनिकेसाठी दरमहा 1.4 लाखांपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागतो. कुटुंबाच्या एकूण उत्पन्नात ईएमआयचा वाटा 50 ते 70% पर्यंत जात असल्याने हा धोकादायक व्यवहार असल्याचा दावा सुजयने केला आहे. त्याच्या मते मध्यमवर्गाने हा धोका टाळायला हवा. जगभरातील अर्थतज्ज्ञ, वित्तीय सल्लागार नेहमी घरभाडे अथवा ईएमआय तुमच्या उत्पन्नाच्या 30% पेक्षा जास्त नसावा असा सल्ला देतात याकडे लक्ष वेधले.

सुजयच्या मते, मालमत्तेतून मिळणार परतावा अत्यंत कमी आहे. 2010 पासून देशातील मालमत्तेच्या वास्तविक किमतींमध्ये वार्षिक केवळ 3% वाढ झाली आहे. तर मुंबईत 2013 ते 2023 या दहा वर्षांत मालमत्तेत केवळ 1% घट झाल्याचे मत त्याने एका अहवालाआधारे मांडले. काही लोक मोठ्या शहरात घर खरेदी करून भाड्यानं देतात. त्यातूनही त्यांना मोठा परतावा हाती लागत नसल्याचा त्याचा दावा आहे.