सोने, चांदीला टाकलं मागे, वर्षभरात 150 टक्क्यांनी रिटर्न्स, हा धातू करतोय कमाल; नेमकं नाव काय?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव सारखा वाढत आहे. परंतु आता एका नव्या धातूची जगभरात चर्चा होत आहे. या धातूने एका वर्षात 150 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.

सोने, चांदीला टाकलं मागे, वर्षभरात 150 टक्क्यांनी रिटर्न्स, हा धातू करतोय कमाल; नेमकं नाव काय?
platinum
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 22, 2026 | 3:27 PM

Platinum Rate Increasing : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात चांगलीच वाढ होत आहे. या दोन्ही धातूंचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यातही सोने आणि चांदीचा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. परंतु सोने आणि चांदीव्यतिरिक्त आणखी एक धातू आहे, ज्याची किंमत फारच वाढत आहे. विशेष म्हणजे या धातूने एका वर्षात तब्बल 150 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. त्यामुळेच आता गुंतवणूकदारांचा कल या धातूमध्ये गुंतवणूक करण्याकडे वाढला आहे. सोने आणि चांदी या धातूमध्ये गुंतवणूक केली तर भविष्यात तुम्हाला फायदाच होतो, असे म्हटले जाते. ही एक सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक आहे, सांगितले जाते. परंतु आता प्लॅटिनमकडेही चांगले परतावा देणारा धातू म्हणून पाहिले जात आहे.

प्लॅटिनमचा भाव तब्बल 150 टक्क्यांनी वाढला

गेल्या वर्षापासून म्हणजेच 2025 सालापासून प्लॅटिनम हा धातू चांगला परतावा देत आहे. या धातूची 2025 साली खूप किंमत वाढली. या वर्षीदेखील प्लॅटिनमची किंमत अशी वाढू शकते, असे सांगितले जात आहे. आकडेवारीत सांगायचे झाल्यास. वर्षभरापूर्वी प्लॅटिनमचा भाव 900 ते 950 डॉलर प्रति औंस एवढा होता. आता हाच भाव 2470 डॉलर प्रति औंसपर्यंत वाढला आहे. म्हणजेच प्लॅटिनमने गुंतवणूकदारांना 150 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. याच वर्षभराच्या कालावधीत सोने आणि चांदीच्या किमतीत साधारण 50 टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळाली.

प्लॅटिनमचा भाव का वाढतोय?

प्लॅटिनम हा धातू अतिशय दुर्मिळ आहे. तो पृथ्वीवर फारच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर या धातूची मागणी आणि त्याची कमतरता यामुळे त्याचा भाव वाढत आहे. सोबतच हा धातू उद्योग क्षेत्रात वेगवेगळ्या कामासाठी वापरला जातो. पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने प्लॅटिनमची किंमत वाढत आहे. प्लॅटिनम हा धातू वाहनांमध्ये कॅटेलॅटिक कन्व्हर्टर म्हणून वापरला जातो. ज्यामुळे प्रदूषण कमी होते. जगभरात प्रदूषणाविषयीचे नियम आणखी कठोर होत आहेत. त्यामुळे वाहननिर्मिती क्षेत्रात प्लॅटिनमची मागणीही वाढली आहे. उर्जानिर्मितीमध्येही प्लॅटिनमची मागणी वाढली आहे.