उपचार, शिक्षण, लग्नासाठी झटपट काढा PF, EPFO ने बदलले नियम, असा होईल फायदा

EPFO- PF Rules: ईपीएफओने PF मधून अंशतः रक्कम काढण्याचा नियम सोपा केला आहे. नवीन नियमानुसार आता किमान 12 महिने नोकरी करणाऱ्यांनाही सहज पीएफ रक्कम काढता येईल. नवीन नियमानुसार एकूण पीएफ रक्कमेपैकी 75% पर्यंत रक्कम काढता येईल. तर 25% रक्कम खात्यात ठेवावी लागेल.

उपचार, शिक्षण, लग्नासाठी झटपट काढा PF, EPFO ने बदलले नियम, असा होईल फायदा
उपचार, शिक्षण, लग्नासाठी झटपट काढा PF
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 18, 2026 | 2:27 PM

केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजे EPFO ने PF खात्यातून रक्कम काढण्याचा नियम सोपा केला आहे. आता नोकरी सुटणे, उपचार, शिक्षण, लग्न आणि घर खरेदी, दुरुस्तीसाठी PF मधून पैसे काढणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे. नवीन नियमात वेगवेगळ्या कारणासाठी तयार 13 नियमांऐवजी तीन मोठ्या श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. तर किमान 12 महिने नोकरी असण्याची तरतूद करण्यात आली आहे. पीएफमधील 75 टक्के रक्कम या नमूद कारणांसाठी काढता येईल. तर खात्यात 25 टक्के रक्कम ठेवणे आवश्यक आहे. नवीन नियम 29 जून 2026 रोजी सूचित केलेल्या EPF योजना, 2026 चा भाग आहे. हा नवीन कायदा जुन्या 1952 च्या नियमांचा भाग आहे.

PF मधून किती रक्कम काढता येणार?

नवीन नियमांमध्ये PF मधून अंशतः रक्कम काढण्यासाठी आणि एक निश्चित रक्कम ठेवण्याविषयीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार, खात्यात किमान 25% रक्कम ठेवणे आवश्यक आहे. तर उर्वरित 75% पर्यंतची रक्कम सदस्य काढू शकतील. या रक्कमेच्या गणनेत कर्मचाऱ्यांचे योग्यदान, कंपनीचे योगदान, त्यावरील व्याज यांचा समावेश आहे. अडचणीच्या काळात कर्मचाऱ्यांना जास्त आणि लवकर रक्कम मिळणे सोपे झाले आहे. समजा तुमच्या पीएफ खात्यात 1 लाख रुपये असतील. तर त्यातील 25000 रुपये खात्यात ठेवावे लागतील. तर 75000 रुपयांपर्यंतची रक्कम पीएफ खातेदाराला काढता येतील.

पीएफ काढण्यासाठी या तीन नवीन श्रेणी

यापूर्वी पीएफ मधून थोडी रक्कम काढण्यासाठी 13 वेगवेगळ्या श्रेणी होत्या. त्यासाठी विविध शर्ती आणि सदस्यता कालावधी लागू होता. आता त्यासाठी तीन नवीन श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत.

1. निकडीच्या काळीत काढा पीएफ

आजारपण, शिक्षण आणि लग्नासाठी अत्यावश्यक खर्चासाठी पीएफची रक्कम अंशतः काढता येते. नवीन नियमानुसार, शिक्षणासाठी सदस्य त्याच्या पीएफ सदस्य कालावधीत 10 वेळा रक्कम काढू शकतात. लग्नासाठी ही सुविधा 5 वेळा इतकी आहे. तर आरोग्य उपचारासाठी एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 3 वेळा रक्कम काढता येते.

2. घर खरेदी, दुरुस्तीसाठी पीएफची मदत

या श्रेणीत घर वा जमीन खरेदी, घर तयार करणे, गृहकर्ज चुकते करणे, घराची दुरुस्ती यासारख्या महत्त्वाच्या कामासाठी पीएफची मदत घेता येईल. यासाठी कमीत कमी 12 महिने पीएफ खात्यात योगदान जमा करणे आवश्यक आहे. या श्रेणीत कमीत कमी पाचवेळा रक्कम काढता येईल.

3. विशेष परिस्थिती

या श्रेणीत सदस्यांना एखाद्या महत्त्वाच्या कारणाचा उल्लेख करून पीएफमधील रक्कम काढता येईल. अचानक आलेल्या खर्चाला तोंड देण्यासाठी ही रक्कम उपयोगी पडते. नोकरी सोडल्यास अथवा नोकरीवरून कमी झाल्यास कर्मचारी तातडीने पीएफ खात्यातून 75 टक्के रक्कम काढू शकतील. जर सलग एक वर्षापर्यंत रोजगार मिळाला नाही तर मग उर्वरीत 25 टक्के रक्कमही त्यांना काढता येईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us