
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या जाण्याने देशभरातून शोक व्यक्त होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहित रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

राज ठाकरे आणि रतन टाटा यांच्या अनेकदा भेटी झाल्या. या भेटींदरम्यानचे फोटो राज ठाकरे यांनी फेसबुकवर शेअर केलेत. त्यांनी रतन टाटांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा 'कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक' गमावला, हे त्याहून मोठं दुःख, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांशी या जगात कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन जसं अचूक केलं आहे तसं इतर कुठे आढळत नाही. त्यात त्यांनी महाराजांना 'श्रीमंत योगी' म्हणलं आहे, रतन टाटांबद्दल विचार करताना, 'श्रीमंत योगी' ही उपमा तंतोतंत पटते, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढयांना पहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब. रतन टाटांना माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली, अशी पोस्ट राज ठाकरेंनी लिहिली आहे.