
सर्वांचं लक्ष लागून असलेल्या सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंचे दर बघता बघता इतके वाढलेत, की सर्व जुने विक्रम एकाच झटक्यात मोडले गेले आहेत. चांदीने तर 4 लाख रुपयांचा टप्पा ओलांडून इतिहास रचला आहे, आणि दुसरीकडे सोन्याची चमकही आता सामान्य खरेदीदाराच्या आवाक्याबाहेर जाताना दिसत आहे. बाजारातील या ऐतिहासिक वाढीमुळे सर्वांनाच विचार करायला भाग पाडले आहे. हे भाव कुठे थांबतील याचाच ाता सर्वांना प्रश्न पडला आहे.
24 तासांत खेळ पलटला
चांदीच्या किमतीत झालेली ही झपाट्याने वाढ बाजारातील तज्ज्ञांना आश्चर्य वाटण्यासारखी नाही. एमसीएक्सवर चांदीची किंमत प्रति किलो 4,07,456 रुपयांवर पोहोचली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीने सर्वकालीन उच्चांक गाठला. चांदीला 4 लाख रुपयांचा जादुई टप्पा गाठण्यासाठी फक्त 15000 रुपयांची आवश्यकता होती, जी त्याने फक्त 24 तासांत गाठली.मात्र ही वाढ अचानक झालेली नाही. गेल्या मंगळवारी चांदीच्या किमतीत 40 हजार 500 रुपयांची मोठी वाढ झाली. दुसऱ्याच दिवशी, बुधवारी, किमतीत आणखी 15 हजारांची वाढ झाली.
सोनंही मागे नाहीच
केवळ चांदीच नाही तर सोन्याचे भावही गगनाला भिडत आहेत. या पिवळ्या धातूची चमक आता चमकदार झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 75 हजार 869 रुपयांवर पोहोचला आहे, जो एक नवीन विक्रम आहे. जर आपण बाजारातील आकडेवारी पाहिली तर, बुधवारी 99.9% शुद्धतेचे सोने 5 हजार रुपयांच्या मोठ्या वाढीसह 1 लाख 71 हजार 000 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन उच्चांकावर बंद झाले.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराची ऐतिहासिक उसळी
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने ऐतिहासिक उसळी मारली. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात तब्बल 13 हजार रुपयांची वाढतर चांदीच्या दरात 22 हजार रुपयांची वाढ झाली. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 82 हजार 310 तर चांदीचे दर जीएसटीसह 4 लाख 1 हजार 700 रुपयांवर पोहोचले आहेत. तिथे सोनं आता 2 लाखांच्या उंबरठ्यावर असून तर चांदीच्या दराने 4 लाखांचा टप्पा पार केला आहे. जळगावात पहिल्यांदाच केवळ 30 दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात एवढी मोठी वाढ झाली आहे. पुढच्या काळात सोने 2 लाखांवर तर चांदीचे दर साडे चार लाखांवर पोहोचतील असा अंदाज सराफ व्यवसायिकांनी व्यक्त केला आहे.
का वाढत आहेत दर ?
सोन्याच्या चांदींच्या किमतीत आलेली ही “त्सुनामी” , यामागे फक्त एक कारण नाही. बाजार तज्ञांच्या सांगण्यानुसार, याला तीन मुख्य आंतरराष्ट्रीय घटक जबाबदार आहेत.
डॉलरची कमजोरी : अमेरिकन डॉलरच्या तीव्र घसरणीमुळे सोने आणि चांदीला पंख मिळाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडील टिप्पण्यांवरून असे दिसून येते की ते कमकुवत डॉलरच्या बाजूने आहेत. जेव्हा जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमती वाढतात कारण गुंतवणूकदारांचा विश्वास करन्सीवरून हटतो आणि धातूंकडे वळतो.
सुरक्षित गुंतवणुकीचा शोध : एचडीएफसी सिक्युरिटीजचे सौमिल गांधी यांच्या मते, सध्या जगभरात भू-राजकीय तणाव आणि व्यावसायिक अनिश्चिततेचे वातावरण आहे. अशा भीतीच्या वातावरणात, आपले भांडवल सुरक्षित करण्यासाठी, लोक शेअर बाजार किंवा चलनाऐवजी सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणे सर्वात सुरक्षित मानतात.
व्याजदराचं गणित : अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणांवरही बाजार बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या व्याजदर स्थिर राहण्याची अपेक्षा असली तरी, भविष्यात व्याजदर कपातीच्या शक्यतेमुळे सोने आणि चांदीची मागणी आणखी वाढली आहे.