महागाई भत्ता 8% वरून 44% पर्यंत वाढला! कोणत्या कर्मचाऱ्यांचे नशीब उजळले?
या राज्याच्या सरकारने केवळ महागाई भत्त्यात (DA) वाढ केली आहे असे नाही, तर त्यांनी ८ व्या वेतन आयोगांतर्गत कर्मचाऱ्यांचे वेतनही सुधारले जाईल, अशी ग्वाही दिली आहे. कोणत्या राज्यातील कर्मचाऱ्यांचे नशीब उजळले आहे जाणून घ्या.

त्रिपुरातील राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण त्रिपुरा सरकारने त्यांच्या महागाई भत्ता/महागाई सवलतीमध्ये अर्थात DA/DR मोठी वाढ करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांनी रविवारी, २२ नोव्हेंबर रोजी आगरतळा येथील मुक्तधारा सभागृहात ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांच्या मेळाव्याला संबोधित करताना ही मोठी घोषणा केली.
महागाई भत्ता 8% वरून 44% पर्यंत वाढला!
अशा प्रकारे, राज्य सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA/DR) ८ टक्क्यांवरून ४४ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, जो जुलै २०२२ पासून लागू झाला आहे. याचा अर्थ एकूण ३६ टक्के गुणांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, त्रिपुरा सरकारने जुलै २०२२ ते नोव्हेंबर २०२६ या ४ वर्षे ४ महिन्यांच्या कालावधीत, विविध टप्प्यांत मिळून महागाई भत्त्यात एकूण ३६ टक्के गुणांची वाढ केली आहे, ज्यामुळे हा दर सुरुवातीच्या ८ टक्क्यांवरून आता ४४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
सरकारचे उद्दिष्ट महागाई भत्त्यातील तफावत कमी करणे
त्रिपुरामध्ये, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता यांच्यातील तफावत कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सध्या, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ६०% महागाई भत्ता मिळतो, तर त्रिपुरातील राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना ४४% महागाई भत्ता मिळतो. याचाच अर्थ की दोन्हीमध्ये १६ गुणांची तफावत आहे. यालाच कमी करायचं आहे. रविवारी याबद्दलही सरकारने घोषणा केली. या आधी हे अंतर जवळपास 30-35% पेक्षा जास्त होतं. पण आता यात बरीच घसरण झाली आहे.
मुख्यमंत्र्यांचे आठव्या वेतन आयोगाबाबत संकेत
मुख्यमंत्र्यांनी असे सूचित केले आहे की, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत गांभीर्याने विचार केला जात आहे. यासंदर्भात अर्थमंत्री प्रणजित सिंहा रॉय यांच्यासोबत सध्या चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत राज्य सरकारचे बजेट 17,000 कोटी रुपयांवरून सुमारे 32,000 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. राज्याची आर्थिक क्षमता आणि संसाधने यांचा आढावा घेतल्यानंतर, सरकार आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हितासाठी योग्य पावले उचलेल.