LIC कडून अदानींचं चांगभलं? 34 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा डाव, अमेरिकन वृत्तपत्राच्या दाव्याने एकच खळबळ

LIC on Adani Group Investment : सर्वसामान्यांची लाडकी कंपनी एलआयसीकडून गौतम अदानी यांचं चांगभलं करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अमेरिकेतील प्रतिष्ठीत दैनिकाने केला आहे. त्यावरून एकच खळबळ उडाली आहे.

LIC कडून अदानींचं चांगभलं? 34 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा डाव, अमेरिकन वृत्तपत्राच्या दाव्याने एकच खळबळ
गौतम अदानी एलआयसी
| Updated on: Oct 26, 2025 | 8:46 AM

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने गौतम अदानी यांच्या अदानी समूहात (Adani Group) 3.9 अब्ज डॉलरची (जवळपास 34,000 कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची योजना आखल्याचा आरोप अमेरिकेतील प्रतिष्ठीत दैनिकाने केला. अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाने याविषयीचे वृत्त दिले होते. त्यावर आता एलआयसीने मोठा खुलासा केला आहे. एलआयसीने हा आरोप फेटाळला आहे. हा खोडसाळपणा असल्याचा दावा विमा कंपनीकडून करण्यात आला आहे. भारताची आर्थिक क्षेत्रातील प्रतिष्ठा आणि प्रतिमा खराब करण्याचा हा प्रयत्न असल्याचे एलआयसीकडून सांगण्यात आले आहे.

एलआयसीने दावा फेटाळला

“वॉशिंग्टन पोस्टने जो आरोप केला आहे की, एलआयसीच्या गुंतवणूक निर्णयावर बाहेरील शक्तींचा प्रबाव आहे. तो पूर्णपणे खोटा, आधारहिन आणि सत्यापासून कोसो दूर आहे. या बातमीत जसा दावा करण्यात आला आहे. तसा कोणताही दस्तावेज वा योजना, एलआयसीनेने कधीच तयार केला नाही.” असा दावा एलआयसीने केला आहे. गुंतवणुकीचा निर्णय विमा कंपनी स्वतंत्रपणे घेते. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय संचालक मंडळांच्या बैठकीत आणि नीतिगत धोरणानुसार, सविस्तर चौकशी आणि पडताळणीनंतरच असे निर्णय घेण्यात येत असल्याचे एलआयसीचे म्हणणे आहे.

अदानी ग्रुपने हात झटकले

देशातील तिसरे सर्वात मोठे औद्योगिक कुटुंब असलेल्या अदानी आणि त्यांच्या अदानी समूहाने वॉशिंग्टन पोस्टचे वृत्त फेटाळले आहे. हा खोडसाळपणा असल्याचे समूहाने स्पष्ट केले. सरकारी योजनेत कंपनीचा सहभाग नसल्याचे समूहाने स्पष्ट केले. एलआयसी देशातील अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. त्यामुळे केवळ अदानी ग्रुपलाच कंपनी झुकते माप देते असा आरोप लावणे चुकीचे असल्याचे म्हणणे कंपनीने मांडले. एलआयसीने अदानीच्या गुंतवणुकीतून जबरदस्त कमाई केल्याचे सांगायला कंपनी विसरली नाही.

काँग्रेसची जहाल टीका

दुसरीकडे काँग्रेसने यासर्व प्रकरणात सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारी विमा कंपनी LIC ने अदानी समूहात जेव्हा कंपनीला मोठे नुकसान झाले, तेव्हा मोठी गुंतवणूक केल्याचा आरोप काँग्रेसने केला. संसदेच्या लोकलेखा समितीने (PAC) याप्रकरणाची चौकशी करुन एलआयसीला अदानी समूहात गुंतवणूक करण्यासाठी कसा दबाव आणला हे समोर आणण्याची मागणी केली. अदानी समूहाला फायदा होण्यासाठी सरकार एलआयसीवर दबाव टाकत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यापूर्वी सुद्धा असेच आरोप करण्यात आले होते. त्यावेळी एलआयसीतील रक्कम शेअर बाजारात न लावण्याची मागणी करण्यात आली होती. आता नवीन वाद उफाळला आहे.