नोटांवर महात्मा गांधींचाच फोटो का? आरबीआयने केला मोठा खुलासा
भारतातील चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधींऐवजी दुसऱ्या एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाचा, संताचा किंवा नेत्याचा फोटो का नाही? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर आरबीआयने दिले आहे.

आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतातील चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो आहे. मात्र तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, दुसऱ्या एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाचा, संताचा किंवा नेत्याचा फोटो का नाही? या प्रश्नाचे उत्तर आरबीआयने दिले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले की, भारतीय नोटांवर रवींद्रनाथ टागोर, मदर तेरेसा यांच्यासह अनेकांचा फोटो लावण्याबाबत चर्चा झाली होती, मात्र शेवटी महात्मा गांधींचे नाव ठरवण्यात आले. त्यामुळे आजही आपल्याला नोटांवर महात्मा गाधींचा फोटो पहायला मिळतो.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, नोटेवर एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे चित्र असेल तर ती ओळखणे सोपे जाते. यामुळे बनावट नोटांना ओळखणेही सोपे जाते. भारतीय नोटांवर रवींद्रनाथ टागोर, मदर तेरेसा आणि अबुल कलाम आझाद यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा फोटा छापण्याबाबत विचार करण्यात आला होता, मात्र शेवटी महात्मा गांधींच्या फोटोवर शिक्कामोर्तब झाले.
स्वातंत्र्यापूर्वी नोटांवर कोणते चित्र होते?
ब्रिटिशांच्या काळात भारतातील चलनावर ऐतिहासिक आणि राजकीय संदर्भांचा उल्लेख होता. चलनावर वनस्पती आणि प्राण्यांचे (वाघ, हरीण) चित्र होते. ब्रिटिश काळात चलनावर हत्ती आणि राजाचेही चित्र छापले जात होते. मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर नोटेवरील चित्रात बदल झाला. काही काळ अशोक स्तंभातील सिंहाचे प्रतीक आणि इतर काही प्रसिद्ध ठिकाणांचाही फोटो चलनावर होता. विज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि हरित क्रांतीतील कामगिरीमुळे आर्यभट्ट आणि शेतकऱ्याचेही चित्र नोटेवर होते.
1969 पासून महात्मा गांधींचे चित्र
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 1969 साली महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनिमित्त 100 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती. यात सेवाग्राम आश्रमाचाही फोटो होता. 1987 पासून प्रत्येक चलनावर महात्मा गांधींचा फोटो छापण्यास सुरुवात झाली. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये 500 रुपयांच्या नोटाही जारी करण्यात आल्या होत्या होत्या.
देशभरात अशा प्रकारे होते पैशांची वाहतूक
आरबीआय ठराविक प्रिंटिंग प्रेसमध्ये पैसे छापते. हे पैसे देशाच्या विविध भागात रेल्वे, जलमार्ग, विमानाचाही वापर केला जातो. ‘आरबीआय अनलॉक्ड: बियॉन्ड द रुपी’ या डॉक्युमेंट्रीमधून ही माहिती समोर आली आहे.